‘हातकणंगले’तील १५४२ संस्था बेपत्ता

By Admin | Updated: November 24, 2015 00:20 IST2015-11-23T23:52:32+5:302015-11-24T00:20:48+5:30

सहकार विभागाचा सर्व्हे : काही संस्था बड्या धेंड्यांच्या

1542 bodies missing from 'Hatkanangle' | ‘हातकणंगले’तील १५४२ संस्था बेपत्ता

‘हातकणंगले’तील १५४२ संस्था बेपत्ता

राजाराम पाटील -- इचलकरंजी -सहकार चळवळीतून समृद्धी निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण परिसरातील लोकांना सुलभपणे रोजगार देण्यासाठी स्थापन झालेल्या औद्योगिक, शेतीमाल प्रक्रिया, पतसंस्था अशा संस्थांचा ठावठिकाणा सापडत नसल्याची माहिती सहकार खात्याच्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. अशा हातकणंगले तालुक्यातील १५४२ सहकारी संस्थांची यादी हातकणंगले तालुका सहकार खात्याचे उपनिबंधक मनोहर माळी यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यामधील काही संस्था राजकीय क्षेत्रातील बड्या धेंड्यांच्या असल्याने खळबळ उडाली आहे.सहकारामुळे ग्रामीण शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आली. सहकारातून साखर कारखाने, सूतगिरण्या, काही औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. त्यातून ग्रामीण परिसरात हजारो जणांना रोजगार मिळाला. कमी भांडवलात अधिक रोजगार मिळावा, या उदात्त हेतूने शासनाने सहकार चळवळीचे जाळे अधिक फैलावण्यासाठी यंत्रमाग, सायझिंग, आॅटोलूम, प्रोसेसिंग अशा वस्त्रोद्योगाबरोबरच शेतीमाल प्रक्रिया, अल्पसंख्याक व मागासवर्गीय घटकांच्या संस्थांना स्थापन करण्यास अर्थसहाय दिले.
अशा प्रकारे शासनाचे भागभांडवल, अर्थसहाय आणि अनुदान मिळविणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या. वस्त्रोद्योगाशी निगडित संस्था स्थापन करण्याचे
पेव फुटले. हातकणंगले तालुक्यात विविध प्रकारच्या सुमारे २७००
संस्था असून, त्यातील बहुतांश इचलकरंजी शहर व भोवतालच्या आहेत. अशा संस्थांकडे शासनाचे ९०० कोटी रुपये अडकून पडल्याचे समजते.
आता बदललेल्या सरकारने प्रत्येक तालुक्यात स्थापन झालेल्या संस्थांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. शासनाकडे नोंद असलेल्या सुमारे ४० टक्के संस्थांचा ठावठिकाणाच मिळत नसल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
मात्र, त्यातील काही संस्थांनी शासनाकडून कोट्यवधींचे
अर्थसहाय उचलले त्याचे काय, असा प्रश्न जनतेतून विचारला जात
आहे. (पूर्वार्ध)

सोसायट्यांच्या फायली आणि दलाल
वस्त्रोद्योगात यंत्रमाग संस्था स्थापन करण्याचे काम साधारणत: वीस वर्षांपूर्वी झाले. त्यांना लागणारे लाखो रुपयांचे अर्थसहाय अगदी सुलभपणे मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर यंत्रमागांबरोबर आॅटोलूम, सायझिंग, प्रोसेसिंग अशा कोट्यवधी रुपये खर्चाच्या संस्था स्थापन होऊ लागल्या. त्यांच्या फायली करणारे दलाल निर्माण झाले. काही संस्थाचालकांना फायली मंजूर झालेल्या संस्था लाखोंना विकल्या. अशी लाखोंची ‘वर कमाई’ केली.

Web Title: 1542 bodies missing from 'Hatkanangle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.