चोरट्यांकडून १४ गुन्हे उघडकीस

By Admin | Updated: December 5, 2014 00:26 IST2014-12-05T00:17:02+5:302014-12-05T00:26:08+5:30

३१ तोळे सोने जप्त : चेनस्नॅचिंगची टोळी

14 crimes exposed by thieves | चोरट्यांकडून १४ गुन्हे उघडकीस

चोरट्यांकडून १४ गुन्हे उघडकीस

जयसिंगपूर : धूमस्टाईलने हिसडा मारून ऐवज लांबविणाऱ्या टोळीकडून चौदा चेनस्नॅचरचे गुन्हे उघडकीस आले असून, ३१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश घार्गे व सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी आज, गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
२७ नोव्हेंबर २०१४ रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले संशयित आरोपी वृषभ आण्णासो उपाध्ये (वय २८), सावकर रावसाहेब चौगुले (२१), संतोष बजरंग सोनटक्के (२२, तिघे रा. हुड्डा चौक, मानकापूर, ता. चिकोडी) व शुभम ऊर्फ गुरू राजेंद्र साळुंखे (१९, रा. नृसिंहवाडी) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीनंतर तपासात या टोळीचा मुख्य सूत्रधार असलेला शीतल मारुती मिरजे (२३) याचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही गजाआड करण्यात आले. पोलीस तपासात या पाचजणांकडून कसून चौकशी केली असता कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शाहूवाडी, गोकुळ शिरगाव, कुरुंदवाड तसेच सांगली शहरात मोटारसायकलीवरून धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत चौदा गुन्हे उघडकीस आले असून, ९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, त्यांचे आणखी साथीदार असण्याचीही शक्यता आहे. या तपास कामात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे, असेही घार्गे आणि डोके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


जयसिंगपुरातील गुन्हे
संशयित आरोपींनी २३ आॅक्टोबर २०१४ ला यशवंत हौसिंग सोसायटी येथे मेघश्री आवटी, १९ नोव्हेंबरला प्रियदर्शन कॉलनी येथे सुशीला पाटील, तर १२ जूनला पोल फॅक्टरी येथे सुशीला कांबळे यांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लांबविले होते, हे तिन्ही गुन्हे तपासात निष्पन्न झाले आहेत. संशयित पाचही आरोपींची नावे पहिल्यांदाच पोलीस रेकॉर्डवर आली आहेत.



चैनीसाठी चोरी
संशयित पाच आरोपींतील शीतल मिरजे हा महाविद्यालयीन तरुण असून, या सर्वांनी चैनीसाठी हे गुन्हे केले आहेत. एक वर्षापासून हा प्रकार सुरू होता. कागल रोडला पहिला गुन्हा त्यांनी केला. चोरून आणलेला हा ऐवज जयसिंगपूर येथील सराफ शेखर गाडेकर याच्याकडे गहाणवट ठेवून संशयितांनी त्या त्या वेळी रक्कम उचलली आहे, अशी माहिती स.पो.नि. डोके यांनी दिली.

Web Title: 14 crimes exposed by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.