उद्यापासून बारावी परीक्षेला सुरुवात; कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:29 PM2024-02-20T13:29:10+5:302024-02-20T13:38:43+5:30

जिल्ह्यात ७३ केंद्र : भरारी पथकांद्वारे कॉपीला आळा

12th exam from tomorrow; 51 thousand students will give the exam in Kolhapur district | उद्यापासून बारावी परीक्षेला सुरुवात; कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

संग्रहित छाया

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी बारावीची परीक्षा उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७३ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ५१ हजार १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सात भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत शिवाय प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्यासह विविध अधिकारीही केंद्रांना भेटी देणार आहेत.

बारावीच्या परीक्षेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १७५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी विभागातील १ लाख १९ हजार १६८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. उद्या, बुधवारी इंग्रजीच्या पेपरपासून या परीक्षेला प्रारंभ होईल. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.

विभागाचे चित्र असे

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मिळून १७५ केंद्रे, एक लाख १९ हजार १६८ विद्यार्थी, २१ भरारी पथके.

परीक्षा केंद्रांवर कडेकोट व्यवस्था

परीक्षा काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, गैरप्रकार टाळण्याच्यादृष्टीने परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. परीक्षार्थी, शिक्षणाधिकारी व शिक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशास प्रतिबंध केलेला आहे. याशिवाय केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एसटीडी बूथ, झेरॉक्स, फॅक्स केंद्र बंद राहणार आहे. परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, मोबाईल, मायक्रोफोन, स्मार्टवॉच, वायरलेस या वस्तू नेण्यासाठी बंदी घातली आहे.

विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके कार्यरत असणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. -दत्तात्रय पोवार, - विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर.

सकारात्मक विचारांने सामोरे जा..

विद्यार्थ्यांच्या जीवनातील दहावी व बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. करिअरची सुरुवातच या टप्प्यावर निश्चित होते. त्यामुळे या परीक्षांचे जरूर महत्त्व असले तरी ही परीक्षा म्हणजेच सारे काही आहे असेही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, तयारी करावी. यशाचा आताच विचार न करता पेपरला शांतपणे सामोरे जावे. परीक्षेचा अनावश्यक ताणतणाव घेतल्यास त्याचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घेऊन त्यास सामोरे जावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

Web Title: 12th exam from tomorrow; 51 thousand students will give the exam in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.