देय ‘एफआरपी’तील १२०० रुपये देणार

By Admin | Updated: May 30, 2015 01:03 IST2015-05-30T00:48:13+5:302015-05-30T01:03:25+5:30

साखर कारखानदारांची बैठकीत तयारी : मालमत्तेचे फेरमूल्यांकन करून नवीन कर्जे द्या

1200 rupees payable in FRP | देय ‘एफआरपी’तील १२०० रुपये देणार

देय ‘एफआरपी’तील १२०० रुपये देणार

कोल्हापूर : उसाच्या थकीत बिलांतील ‘एफआरपी’पैकी प्रतिटन १२०० रुपये शेतकऱ्यांना देण्यास साखर कारखानदारांनी तयारी दर्शविली आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून मदत मिळाल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना देण्याची तयारीही कारखानदारांनी बैठकीत दर्शविली. मालमत्तेचे फेरमूल्यांकन करून नवीन कर्जे द्यावीत, यासाठी ‘नाबार्ड’कडे प्रयत्न करावेत, अशी मागणीही कारखानदारांनी केली.
साखर कारखान्यांच्या थकीत कर्जवसुली व शेतकऱ्यांच्या ऊस बिलांबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. गेल्यावर्षी जिल्हा बँकेचे मेअखेर ७५ टक्के पीककर्जाची वसुली झाली होती पण यंदा फेबु्रवारीत तुटलेल्या उसाचे ८३३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे. त्यामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे, केवळ ६१ टक्के वसुली झाली आहे. वसुलीबाबत कारखान्यांनी सहकार्य करावे, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. त्यावर शासनाने पॅकेज देण्याची केवळ घोषणा केली आहे, पण त्यातील एक दमडीही मिळाली नसल्याने पैसे द्यायचे कुठून, असा सवाल कारखानदारांनी केला. जिल्हा बँक व राज्य बँकेकडे कारखान्यांचे शिल्लक असलेले पैसे द्यावे, त्यातून किमान शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा हप्ता तरी जाईल, अशी कारखानदारांची भूमिका मांडली. त्यानंतर बँकेकडे शिल्लक असणारी रक्कम कारखान्यांना देण्याचे आश्वासन अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिले.
बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील पाटील-कौलवकर, गणपतराव पाटील, समरजीतसिंह घाटगे, प्रकाश आवाडे, व्ही. एम. केसरकर, विजयमाला देसाई, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विजय औताडे, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


जुनं-नवं करण्यास मदत
जूनअखेर पीककर्जाची परतफेड झाली तर पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होते पण कारखान्यांची अवस्था पाहिली तर एफआरपीप्रमाणे पैसे मिळणे मुश्कील आहे. सुरुवातीला प्रतिटन १२०० रुपये का असेना तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जाला जमा झाले तर त्यांना कर्ज खाते जुनं-नवं करण्यास मदत होणार आहे.
जिल्हा बँकेचे ४०० कोटी अडकले
साखर कारखान्यांकडून जिल्हा बॅँकेचे सुमारे ४०० कोटी रुपये कर्ज येणे आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले तरच विकास संस्थांची वसुली पर्यायाने जिल्हा बँकेची वसुली होऊ शकते.

जिल्हा बॅँकेकडून यांना कर्जपुरवठा
हमीदवाडा, कुंभी, शाहू, शरद
राज्य बँकेकडून कर्जपुरवठा
बिद्री, भोगावती, राजाराम, आजरा
उर्वरित कारखान्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जपुरवठा

Web Title: 1200 rupees payable in FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.