बसेस दुरुस्तीसाठी १२ बैठका, ३९ पत्रे
By Admin | Updated: January 14, 2016 00:30 IST2016-01-14T00:30:54+5:302016-01-14T00:30:54+5:30
प्रचंड तक्रारी : के.एम.टी.च्या मागण्या कंपनीकडून बेदखल; वॉरंटी संपण्याची भीती; प्रशासन हतबल

बसेस दुरुस्तीसाठी १२ बैठका, ३९ पत्रे
कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमाने (के.एम.टी.) घेतलेल्या नव्या कोऱ्या ७५ बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण दिवसें-दिवस वाढल्याने के.एम.टी. प्रशासनाने संबंधित कंपनीला ३९ पत्रे लिहिली, १२ वेळा बैठका घेतल्या तरीही कंपनीकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने के.एम.टी. प्रशासन हतबल झाले आहे.
गतवर्षी फेबु्रवारीत पंचवीस बसेस के.एम.टी.च्या ताफ्यात आल्या, त्यानंतर टप्प्याटप्प्याने पन्नास बसेस मिळाल्या; परंतु शहरातील रस्त्यावर या बसेस धावायला लागल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून तक्रारी यायला लागल्या. कसबा बावडा येथून पेठवडगांवकडे जाणाऱ्या बसच्या मागची चार चाके अक्षरश: निखळून पडली होती. नवीन बसेस किती चांगल्या गुणवत्तेच्या असतील याचा अंदाज त्याचवेळी प्रशासनाला आला होता. त्यानंतर तक्रारींचा आलेख वाढत गेला.
के.एम.टी.च्या यंत्रशाळेतील कर्मचारी तसेच चालकांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन बसेसचे क्लच नीट आॅपरेट होत नाहीत, गिअर व्यवस्थित पडत नाहीत, चाकांना चिकटा येतो, बस डाव्या किंवा उजव्या बाजूला ओढली जाते, प्रेशर प्लेट फिंगर तुटण्याचे प्रकार घडत आहेत. परंतु, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यापलीकडे के.एम.टी. प्रशासन काहीच करू शकलेले नाही.
प्रत्यक्ष बसेस रस्त्यावर धावायला लागल्यानंतर या तक्रारी केल्या जाऊ लागल्या. कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी या बसेस दुरुस्त करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला असला तरी नव्या बसेस वारंवार या ना त्या कारणाने बंद राहणे अयोग्य आहे. यामध्ये के.एम.टी.चे शेड्युल बदलून गेले असून, नुकसानही होत आहे. ज्या कंपनीकडून या बसेस घेतल्या, त्या कंपनीला ३९ वेळा तक्रारींची पत्रे पाठविण्यात आली. १२ वेळा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन त्यांच्यासमोर गाड्यांच्या तक्रारी मांडल्या गेल्या आहेत. तरीही कंपनीकडून वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याने काही बसेस १० ते १२ दिवसांहून अधिक काळ बंद ठेवाव्या लागल्या आहेत. नव्या बसेस रस्त्यावर धावायला लागल्यापासून पाच ते सहा महिन्यांतच हे प्रकार घडायला लागले आहेत. (प्रतिनिधी)
वर्कशॉपमध्ये बस पेटली
९ जानेवारीला रात्री रॅम्पवर उभी असलेली बस पेटल्याचा प्रकार घडला होता. (एम.एच.०९ सी. व्ही. ३९४) ही बस त्या रात्री दुरुस्तीच्या कामासाठी रॅम्पवर उभी केली होती. अचानक उजव्या बाजूचा हेडलाईट व मीटरने पेट घेतला. यंत्रशाळेत असलेल्या अग्निशामक उपकरणांच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणली; मात्र काही प्रमाणात नुकसान झालेच. ही बस रस्त्यावर धावत असताना जर असा प्रकार घडला असता तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती.
वॉरंटी संपल्यानंतर काय ?
नव्या बसेसचा दर्जा आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. वॉरंटी काळात कंपनी बसेस दुरुस्त करून देईल; पण आणखी काही दिवसांनी वॉरंटी संपली तर या बसेसचा देखभाल दुरुस्तीचा खर्च के.एम.टी.ला पेलवणारा नसेल. परिणाम नव्या म्हणून घेतलेल्या बसेस केवळ दुरुस्तीअभावी आणि स्पेअर पार्टअभावी बंद ठेवाव्या लागल्या तर के.एम.टी. पुन्हा एकदा अडचणीत सापडेल.
स्वस्तात मिळाल्या म्हणून ...
महानगरपालिका प्रशासनाने के.एम.टी.कडे बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. एकूण तीन कंपन्यांनी नव्या बसेस पुरविण्यासाठी निविदा भरल्या होत्या. ज्या कंपनीने बसेस पुरविल्या त्यांनी ३० ते ३५ हजार रुपयांनी कमी दराची निविदा भरली होती. त्यांच्या दराबाबत आणखी घासाघीस केल्यानंतर आणखी काही रक्कम कमी झाली. स्वस्तात मिळाल्या म्हणून बसेस घेतल्या खऱ्या, पण आता त्यांच्या गुणवत्तेची जबाबदारी कोणी घेणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. दराच्या नादात गुणवत्तेवर पाणी सोडल्याचे स्पष्ट होत आहे.
८२ च्या बसेस आजही धावतात...
के.एम.टी.च्या ताफ्यात अन्य एका कंपनीच्या बसेस आहेत. सन १९८२ मध्ये खरेदी केलेल्या या बसेस देखभाल, दुरुस्तीनंतर नीट चालतात. गेले ३३ वर्षे या बसेस जनतेच्या सेवेत आहेत. खरंतर या बसेसचे आयुष्यमान संपलेले आहे तरीही या बसेस विनाखंड रस्त्यांवर धावत आहेत, पण आठ- नऊ महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या बसेस मात्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने खुद्द कर्मचाऱ्यांतूनच नाराजी व्यक्त होत आहे.