118 teacher transfers filled with wrong information | चुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्या
चुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्या

ठळक मुद्देचुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्याअमन मित्तल, पदाधिकारी असीम गुप्तांच्या भेटीसाठी मुंबईत

कोल्हापूर : गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी घेऊन पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून आज, बुधवारी सर्वजण ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार आहेत

गेल्या वर्षी परजिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी जे फॉर्म भरले होते, त्यामध्ये ‘नोकरी सुरू’ या कॉलममधील तारखा चुकीच्या लिहिल्या होत्या. त्यामुळे या सर्वांना सोयीची बदली ठिकाणे मिळाली होती. दरम्यान, राज्यातील अनेक शिक्षकांनी अशा प्रकारे चुकीची माहिती भरल्याने तसेच चुकीचे अंतर दाखविल्याने अशा सर्वांची एक वेतनवाढ रद्द करण्याचा आणि पुन्हा त्यांची बदली करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला होता.
यावरून गेले आठ महिने जिल्हा परिषदेमध्ये गरमागरम चर्चा सुरू होती.

अन्य जिल्हा परिषदांमध्ये कारवाई झाल्याने कोल्हापुरात कारवाई का नाही, अशी विचारणा सुरू झाली. यानंतर चौकशी करून, सुनावणी घेऊन यातील ११८ शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर यातील १०० जणांना क्लीन चिट देण्याचा निर्णय झाला.

मात्र या निर्णयावरून सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गोेंधळ उडाला. शिक्षा देणारच असाल तर सगळ्यांना द्या, अशी मागणी करून ठरावही करण्यात आला. त्यामुळे पुन्हा १८ शिक्षकांनी सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेतली.

महाडिक यांनी अमन मित्तल यांच्याशी चर्चाही केली. मात्र सर्वसाधारण सभेचा ठराव आणि ग्रामविकास विभागाचा आदेश यांचा विचार करून या सर्वांच्या पुन्हा बदल्या करण्याचा निर्णय मित्तल यांनी घेतला आहे.

पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षकांची बाजू

सोमवारी दिवसभर जिल्हा परिषदेत थांबलेल्या या ११८ शिक्षकांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेतली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अंबरीश घाटगे, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, विजय भोजे, ‘स्वाभिमानी’चे राजेश पाटील हे मुंबईला रवाना झाले आहेत. आज, बुधवारी ते ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगणार आहेत.

गेले वर्षभर संघटना पदाधिकारी ‘झेडपी’तच

शिक्षकांच्या बदल्यांचा विषय अतिशय क्लिष्ट झाल्याने विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी गेले वर्षभर बहुतांश वेळा जिल्हा परिषदेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. उन्हाळी सुटी सुरू झाल्यापासून तर बहुतांश पदाधिकारी आणि शिक्षक गाठीभेटींमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे.

 


Web Title: 118 teacher transfers filled with wrong information
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.