१०७२ शाळा भरतात उघड्यावरच; ८९५ मैदानाविनाच !
By Admin | Updated: July 1, 2014 00:55 IST2014-07-01T00:55:03+5:302014-07-01T00:55:55+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांची व्यथा : तब्बल ११९५ मुख्याध्यापकांना बसण्यासाठी खोलीच नाही, सोयी-सुविधा मिळणार कधी ?

१०७२ शाळा भरतात उघड्यावरच; ८९५ मैदानाविनाच !
राजाराम लोंढे : कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या २०२८ शाळांपैकी तब्बल १०७२ शाळा उघड्यावरच आहेत. संरक्षण भिंती नसल्याने या शाळांची सुरक्षितताच धोक्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यातील २०५ शाळांचा समावेश आहे. केवळ संरक्षण भिंतींची वाणवा आहे, असे नाही तर तब्बल ११९५ मुख्याध्यापकांना बसण्यासाठी खोलीच नाही, तर ८९५ शाळांना मैदानच नाही.
जिल्हा परिषदेचे प्रशासन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून ‘ई-लर्निंग’सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षण विभागाच्या वतीने राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जशी अत्याधुनिक साधनसामग्रींची गरज असते, तशी त्या शाळेची भौगोलिक स्थितीही मजबूत असणे गरजेचे असते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई)नुसार या सुविधा असणे बंधनकारक आहे. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर असला तरच शाळेतील वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते. यासाठी शाळांच्या संरक्षण भिंती, प्रशस्त मैदान, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, पाण्याची व्यवस्था, अशा मूलभूत सुविधा तिथे असणे गरजेचे आहे; पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या सुविधा कमी आहेत.
शाळा इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या सभोवती कंपौंड (संरक्षण भिंत) असणे गरजेचे आहे. इमारतीबरोबर शाळेचा बगिचा, परिसरातील झाडे यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने संरक्षण भिंतींची गरज शाळांना आहे.
दहा शाळा इमारतीविनाच !
जिल्ह्यात दहा शाळा इमारतीविनाच आहेत. यामध्ये भुदरगड, चंदगड, राधानगरी व शाहूवाडी तालुक्यांतील शाळांचा समावेश आहे.