एलआयसी एजंटांच्या काम बंद आंदोलनास १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:22 IST2021-03-24T04:22:47+5:302021-03-24T04:22:47+5:30
कोल्हापूर : विविध मागण्यासाठी एलआयसी एजंटानी मंगळवारी देशभर पुकारलेल्या एकदिवसीय काम बंद आंदोलनास काेल्हापुरातही १०० टक्के प्रतिसाद मिळाला. ऑल ...

एलआयसी एजंटांच्या काम बंद आंदोलनास १०० टक्के प्रतिसाद
कोल्हापूर : विविध मागण्यासाठी एलआयसी एजंटानी मंगळवारी देशभर पुकारलेल्या एकदिवसीय काम बंद आंदोलनास काेल्हापुरातही १०० टक्के प्रतिसाद मिळाला. ऑल इंडिया कोल्हापूर डिव्हिजनल कौन्सिल लियाफीअंतर्गत कोल्हापूर, सिंधुदुर्ग. रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील १८ शाखातील ७ हजार ५०० एजंटानी विश्राम दिवस पाळल्याने काम ठप्प झाले.
ग्राहकांच्या विमा पॉलिसीच्या प्रीमिअमवरील व दंडाच्या रकमेवरील जीएसटी रद्द करावा, विमा पॉलिसीचा बोनस दर वाढवावा, डायरेक्ट मार्केटिंग बंद करावे, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळावा, विमा कव्हर, ग्रॅच्युईटी रकमेत व कमिशनमध्ये वाढ करावी या मागण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. एजंटाच्या या आंदोलनाला विकास अधिकारी विमा कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिल्याने मंगळवारी एलआयसीचे काम थांबले.
कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष शरद हुक्केरी, जनरल सेक्रेटरी शिरीष कुलकर्णी, कोल्हापूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष विकास घारे, कोकण विभाग कार्याध्यक्ष मनोज भाटवडेकर, कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष अजय कापसे, सेक्रेटरी राजाराम घाटगे, अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी, विमा प्रतिनिधींनी सहभाग घेतला. एलआयसीकडे विविध मागण्या प्रलंबित आहेत, या सोडवल्या नाहीत आणि याकडे आणखी दुर्लक्ष केल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला.