VIDEO: हसून माझी आठवण काढा! व्हिडीओ स्टेटस ठेऊन तरुणाची नदीपात्रात उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 20:17 IST2021-05-10T20:12:45+5:302021-05-10T20:17:36+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांकडून मयूर जाधवचा शोध सुरू; अद्याप थांगपत्ता लागला नाही

VIDEO: हसून माझी आठवण काढा! व्हिडीओ स्टेटस ठेऊन तरुणाची नदीपात्रात उडी
कल्याण: मोबाईलवरील व्हॉटसअॅपवर व्हिडीओ ठेवून मयूर रामा जाधव या १८ वर्षीय तरूणाने नदीपात्रात उडी घेतल्याची खळबळजनक घटना कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी पूलाच्या ठिकाणी सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मयूरचा शोध सुरू केला. परंतु संध्याकाळी उशीरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.
मयूर कल्याण पश्चिमेकडील बारावे गावातील आहे. दुपारी त्याने आपली दुचाकी गांधारी पूलाच्या बाजूला लावली आणि नदीत उडी मारली. दरम्यान उडी मारण्यापूर्वी त्याने त्याच्या मोबाईलच्या व्हॉटसअॅप स्टेटसवर व्हिडीओ ठेवला. त्यामध्ये दारू ही माणसाच्या जीवनातील बेकार गोष्ट असल्याचे त्याने सांगितले आहे. काही गोष्टी अशा घडल्या की, मला समोर काहीच रस्ता दिसत नाही. माझी आठवण जेव्हा काढाल तेव्हा हसून आठवण काढा, तुमच्या जीवनात असा जोकर होतो, जो आतून तुटलेला असतानाही तुम्हाला हसवत राहिला असे मयूरने त्यात म्हटले आहे.
कल्याण-मला आता कोणताच रस्ता दिसत नाही; माझी हसून आठवण काढा; व्हिडीओ स्टेटस ठेवून तरुणाची नदीपात्रात उडी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/s2wZmu0yDL
— Lokmat (@MiLOKMAT) May 10, 2021
मोबाईलवरील व्हॉटसअप स्टेटसवरून ही घटना समोर येताच खडकपाडा आणि पडघा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने नदीत उडी मारलेल्या मयूरचा शोध घेण्यास सुरूवात केली. परंतू तो आढळून आला नाही. रात्री अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आल्याची माहीती आधारवाडी अग्निशमन केंद्राचे उपस्थानक अधिकारी विनायक लोखंडे यांनी दिली. दरम्यान मयूरने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.