संसार उद्ध्वस्त, तो उभा करण्यासाठी मदत करा; सप्तशृंगीच्या रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:12 IST2025-05-23T10:12:23+5:302025-05-23T10:12:38+5:30
त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली आहे.

संसार उद्ध्वस्त, तो उभा करण्यासाठी मदत करा; सप्तशृंगीच्या रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण :कल्याण पूर्वेतील चिकणी पाड्यातील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमुळे बेघर झालेल्या रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली पालिकेला भेट देत आपल्या पुनर्वसनाची मागणी केली. आमचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. आम्हाला तो पुन्हा उभा करण्यासाठी मदत करा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. इमारतीतील ५० कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या सेक्रेटरी रेखा पाठारे यांनी सांगितले की, हा आमचा मोर्चा नाही. आम्ही पालिकेस निवेदन द्यायला आलो आहोत. दुर्घटनेनंतर पालिकेने आम्हा रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली.
आता जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. शाळा प्रशासनाला पावसाळ्यापूर्वी शाळेची डागडुजी करावी लागते. त्यामुळे रहिवासी तेथे फार काळ राहू शकत नाहीत. आमच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली पाहिजे.
मदतीची रक्कम लवकर द्यावी
पाठारे पुढे म्हणाल्या, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली. ती रक्कम लवकर मिळावी. जे जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचार खर्चासाठी सरकारने मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल हे कामानिमित्त बाहेर असल्याने रहिवाशांची अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी भेट झाली. आयुक्त गोयल शुक्रवारी दुपारी एक वाजता भेटतील, असे रहिवाशांना सांगण्यात आले.
आपबिती सांगताना रडू कोसळले
आमचे पुनर्वसन केले पाहिजे. घटना घडली तेव्हा आम्हाला १५ मिनिटांत घरातील पैसा, दागिने, कागदपत्रे काढण्यासाठी वेळ दिला होता. अनेक वर्षांचा मांडलेला संसार १५ मिनिटांत कसा बाहेर काढणार, असे त्या म्हणाल्या. आमच्या घरातील लोक मृत्युमुखी पडले. त्याला तिसरा दिवस झाला नाही तोच आम्ही घराबाहेर पडून पालिका गाठली आहे. हे सांगताना पाठारे यांना रडू कोसळले.