महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणामध्ये महिलांचा साडी वॉकेथॉन
By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2025 21:08 IST2025-03-08T21:07:38+5:302025-03-08T21:08:20+5:30
Kalyan Women's Day Update: देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणात साडी वॉकेथॉन उपक्रम राबविण्यात आला. कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता.

महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कल्याणामध्ये महिलांचा साडी वॉकेथॉन
- मुरलीधर भवार
कल्याण - देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणात साडी वॉकेथॉन उपक्रम राबविण्यात आला. कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता.
कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून या साडी वॉकेथॉनला सुरुवात झाली. कल्याण शहरातील डॉक्टर, उद्योजक, नोकरदार, गृहिणी अशा सर्वच गटातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांनी भारतातील महिलांचा पारंपरिक वेश म्हणून समजला जाणारा जाणाऱ्या साडी नेसून या उपक्रमात भाग घेत ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृतीचा संदेश दिला. ज्यामध्ये केडीएमसीच्या आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, कल्याण आयएमए अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, डॉ. सारिका दुबे, डॉ. किरण शिंदे, डॉ. सोनाली पाटील यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथून निघालेला हा साडी वॉकेथॉनची राणी लक्ष्मीबाई उद्यानात सांगता झाली.
त्यानंतर याठिकाणी असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्र परिसरात कॅन्सर तज्ञ डॉ. अंजुम सय्यद, डॉ. अमित घाणेकर या दोघांनीही ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरबाबत महिलांना मार्गदर्शन केले. हे दोन्ही कॅन्सर आपली लक्षणे दाखवत असतात, महिला वर्गाने त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीनं चाचणी करणे आवश्यक आहे. व्हॅक्सिन तज्ञ डॉ. सोनाली पाटील यांनी ब्रेस्ट आणि सर्व्हायकल कॅन्सरसाठी भारतात उपलब्ध असलेल्या व्हॅक्सिनची उपस्थित महिलांना सखोल माहिती दिली. व्हॅक्सिन कोणी आणि किती वयामध्ये घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांनी स्वतःचे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. विशेषता नोकरदार महिलांनी वेळेचे नियोजन केल्यास आरोग्य चांगले राहील असे सांगितले.