कल्याणला रुग्णालयाच्या दारातच महिलेचा मृत्यू; रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:28 IST2025-05-06T06:28:22+5:302025-05-06T06:28:34+5:30
खडेगोळवली परिसरातील सविता या उल्हासनगरमधील एका कंपनीत शिलाईचे काम करतात.

कल्याणला रुग्णालयाच्या दारातच महिलेचा मृत्यू; रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने घडली दुर्घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात एका महिलेला उपचारासाठी आणले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला डॉक्टरांनी कळवा सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने तिचा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सविता गोविंद बिराजदर (४३) असे आहे.
खडेगोळवली परिसरातील सविता या उल्हासनगरमधील एका कंपनीत शिलाईचे काम करतात. त्यांना एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. सविता यांची प्रकृती सोमवारी बिघडल्याने घरच्यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात दुपारी एक वाजता तिला आणले. तपासल्यानंतर सविता यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र कळव्याला हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यासाठी सविताच्या नातेवाइकांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र त्या रुग्णवाहिका चालकाने येतो असे सांगितले मात्र त्याला विलंब झाला.
पालिकेची रुग्णवाहिका आल्यानंतर रुग्णवाहिका चालकाने एकच रुग्ण कळव्याला घेऊन जाणार नाही, असे सांगत महिलेला उपचारासाठी कळवा रुग्णालयात नेण्यास नकार
दिला. रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत असलेल्या सविता यांचा सायंकाळी पाच वाजता रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच मृत्यू झाला.
४८ तासांच्या आत चौकशी पूर्ण करणार : उपायुक्त
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या दरवाजात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने मृत्यू झालेल्या महिलेच्या संदर्भात ४८ तासांत चौकशी पूर्ण करून तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन महापालिकेच्या आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिले.
बोरकर म्हणाले, संबंधित डॉक्टर, रुग्णवाहिकाचालक यांच्यासह जे कोणी जबाबदार असतील त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. चौकशीकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली जाणार आहे. उपायुक्त बोरकर यांच्या आश्वासनानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्काराची तयारी केली.
काय म्हणाले डॉक्टर...
याप्रकरणी रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पगारे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही, हे मान्य केले.
तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
सविताच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या विरोधात जोपर्यंत कठाेर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली.
हा प्रकार कळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह संजय मोरे, संदीप तांबे यांनी रुग्णालयात धाव घेऊन संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.