कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट; ३ जण जखमी
By मुरलीधर भवार | Updated: December 18, 2023 15:28 IST2023-12-18T15:28:00+5:302023-12-18T15:28:15+5:30
पोलिस ठाण्यात केबल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल.

कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा ब्लास्ट; ३ जण जखमी
कल्याण: कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी परिसरातील रामदेव चौधरी चाळीतील एका घरात वायफाय राऊटरचा ब्लास्ट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या ब्लास् प्रकरणी केबल चालकाच्या विरोधात टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदेव चौधरी चाळीत राहणाऱ्या सायमा शेख यांच्या घरात परवा संध्याकाळी सहा वाजता केबल वायफायच्या राऊटरचा ब्लास्ट झाला. या घटनेत सायम यांची दहा वर्षाची मुलगी नाजमीन ही भाजली आहे. तिचा चेहरा आणि दोन्ही हात भाजले आहेत. तिच्यावर खाजगी रुग्णलायात उपचार सुरु आहेत. सायमा यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या नगमा अन्सारी ही महिला ८० टक्के भाजली आहे. तर तिचा तीन महिन्याचा लहान मुलगा अरमान हा ५० टक्के भाजला आहे.
या दोघांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी केबल चालक राजू म्हात्रे याने केबल चालवित असताना सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.