Corona Virus in KDMC: दुकानं बंदच्या निर्बंधावर काय म्हणाले केडीएमसी आयुक्त? व्यापाऱ्यांनी घातला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:34 IST2021-03-27T13:33:53+5:302021-03-27T13:34:34+5:30
Kalyan Dombivli News: शनिवारी, रविवारी अनेक नागरिक सुट्टीनिमित्त बाहेर पडतात. अशा वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून दुकानं आणि फेरीवाले यांना या दोन्ही दिवशी बंदी घालण्यात आली आहे.

Corona Virus in KDMC: दुकानं बंदच्या निर्बंधावर काय म्हणाले केडीएमसी आयुक्त? व्यापाऱ्यांनी घातला गोंधळ
- मयुरी चव्हाण
कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर शहरांप्रमाणे केडीएमसीने सुद्धा नवीन निर्बंध लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं शनिवारी आणि रविवारी पूर्णत: बंद राहतील, असे निर्देश शुक्रवारी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानंतर शनिवारी या निर्णयावरून कल्याण आणि डोंबिवलीतील काही व्यापा-यांनी गोंधळ घालत प्रशासनाला जाब विचारला. यासंदर्भात आयुक्तांनी लोकमतशी खास बातचीत केली आहे. इतर शहरातही असे निर्बंध लागू झाले आहेत. तेथील व्यापारी महापालिका प्रशासनाला पाठिंबा देत आहेत. त्याचप्रमाणे येथील व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला पाठींबा द्यावा अशी रोखठोक भूमिका सूर्यवंशी यांनी मांडली आहे. (Shop keepers should close shops on Saturday, sunday due to corona.)
शनिवारी ,रविवारी अनेक नागरिक सुट्टीनिमित्त बाहेर पडतात. अशा वेळी जास्त गर्दी होऊ नये म्हणून दुकानं आणि फेरीवाले यांना या दोन्ही दिवशी बंदी घालण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात आल्यावर पुन्हा फेरविचार केला जाईल . हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा पार्सल सेवा सुरू आहेत असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. काही विशिष्ट ठिकाणच्या व्यापा-यांनीच याला विरोध केला असला तरी इतर सर्व ठिकाणची दुकाने बंदच आहे. नाशिक, नागपूर या शहरात यापूर्वीच दुकानं बंद ठेवण्यात आली. या निर्णयाला तेथील व्यापा-यांनी पाठींबा दिला. त्याचप्रमाणे नागरीकांचे हित लक्षात घेऊन येथील व्यापा-यांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे मत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे.
डोंबिवलीतील व्यापा-यांनी केडीएमसीच्या विभागीय कार्यालयाजवळ एकत्र येत गोंधळ घातला व रास्ता रोकोही केला. यावेळी सोशल डिस्टसिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसला. दरम्यान व्यापा-यांच्या विनंतीवरून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 ही दुकानांची वेळ बदलून सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत दुकानं खुली ठेवण्यात प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र शनिवार रविवार चा निर्णय व्यापा-यांना मान्य नसल्याने त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत साथरोग प्रतिबंध कायद्याला हरताळ फासल्याचे दिसून आले.