...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा
By प्रशांत माने | Updated: March 14, 2024 19:28 IST2024-03-14T19:28:32+5:302024-03-14T19:28:45+5:30
उच्च शिक्षणासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते.

...अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला टाळे ठोकू, मनसेचा इशारा
कल्याण: मुंबई विद्यापीठाच्या कल्याण मधील उपकेंद्रात पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू न करण्यात आल्याने याठिकाणी केवळ ११ विद्यार्थीच शिकत असून याठिकाणी पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू करावा अन्यथा उपकेंद्राला टाळे ठोकू असा इशारा मनसेने दिला आहे.
मनसेचे माजी आमदार, प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहरअध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरूवारी उपकेंद्राला भेट देत तेथील आढावा घेतला. उच्च शिक्षणासाठी कल्याणसह आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावे लागते. यासाठी माजी आमदार भोईर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात पाठपुरावा करून कल्याणमध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करून घेतले होते. वसंत व्हॅली परिसरात उपकेंद्रांची वास्तू उभारण्यात आली आहे. उपकेंद्र सुरू होऊन पाच वर्षे झाली पण येथील अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने या अभ्यासक्रमांची माहितीच विद्यार्थ्याना होत नाही.
त्यामुळे याठिकाणी केवळ ११ विद्यार्थीच शिक्षण घेत आहेत. याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. तर याठिकाणी नेहमीच निवडणूक विभाग निवडणुकीच्या वेळी आपले कार्यालय थाटत असल्याने हे विद्यापीठ उपकेंद्र आहे कि निवडणूक कार्यालय असा सवाल देखील मनसेने उपस्थित केला. सध्या याठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने प्रशासनाला केवळ निवेदन देत याठिकाणी पूर्ण क्षमतेने सर्व अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी मनसेने केली.