रिसेप्शनिस्टनी ‘गोकुळ’च्या वहिनीच्या कानशिलात मारल्याचा व्हिडीओ उजेडात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:23 IST2025-07-24T11:23:33+5:302025-07-24T11:23:52+5:30
गोकुळ, त्याच्या भावाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

रिसेप्शनिस्टनी ‘गोकुळ’च्या वहिनीच्या कानशिलात मारल्याचा व्हिडीओ उजेडात
कल्याण : पूर्वेकडील नांदिवली भागातील एका खासगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग झाल्याच्या घटनेत बुधवारी नवा ट्विस्ट आला. रिसेप्शनिस्टने गोकुळ झा याची वहिनी अनन्या हिच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ उजेडात आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी गोकुळ, त्याचा भाऊ रंजीत यांना बुधवारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सोमवारी क्लिनिकमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर गोकुळ पसार झाला होता. पोलिसांची पथके त्याला शोधत होती. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला नेवाळी नाका येथे पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
सरकारी वकील अनंत अडसर यांचा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना आरोपी गोकुळने अरेरावी केली. पोलिसांना धक्काबुक्की करत तो गोंधळ घालू लागला. यावर न्या. आरती शिंदे यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद थांबवून गोकुळला सक्त ताकीद दिली. न्यायालयाच्या कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल होईल, असे सांगितल्यावर तो शांत झाला, अशी माहिती पीडितेचे वकील ॲड. हरीश नायर यांनी दिली. गोकुळने न्यायालयात कोणतीही अरेरावी केली नाही. तो त्याची बाजू मांडत होता. मी मारहाण केली असताना माझ्या भावाला का आरोपी केले, असे तो न्यायालयाला सांगत होता. पण, न्यायालयाने कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करू, असे सांगितल्यावर तो शांत बसला, अशी माहिती आरोपींचे वकील ॲड. संजय धनके यांनी दिली. गोकुळचा त्या तरुणीचा विनयभंग तसेच तिला मारहाण करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. या वादाला नाहक मराठी-अमराठी असे वळण दिले, असेही धनके यांनी सांगितले.
पीडितेची गोकुळच्या वहिनीला मारहाण
क्लिनिकमध्ये ज्या ठिकाणी गोकुळने पीडित रिसेप्शनिस्टला मारहाण केली. त्या ठिकाणचे दुसरे सीसीटीव्ही फूटेज उजेडात आले. त्यात संबंधित रिसेप्शनिस्टने गोकुळची वहिनी अनन्या झा हिच्या कानशिलात लगावल्याचे दिसत आहे. वहिनीला रिसेप्शनिस्टने मारहाण केल्याने गोकुळने तिला मारहाण केली, असे झा कुटुंबाचे म्हणणे आहे तर पीडितेला गोकुळने अमानुष मारहाण केल्यानंतरही त्याची वहिनी दिराला जाब का विचारत नाही, या रागातून त्या रिसेप्शनिस्टने वहिनीच्या कानशिलात लगावली, असे पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे; परंतु, या नव्या व्हिडीओमुळे प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याची चर्चा आहे.