उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला
By सदानंद नाईक | Updated: June 14, 2025 23:07 IST2025-06-14T21:35:52+5:302025-06-14T23:07:38+5:30
रस्ते पाण्यात जाऊन झाडेही पडली

उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला
- सदानंद नाईक
उल्हासनगर : सायंकाळी आलेल्या पावसाने शहराला झोडापले असून कॅम्प नं-५ तानाजीनगर येथील नाल्यावरील पूल कोसळला. तसेच अनेक रस्ते पाण्याखाली येऊन, व्हीटीसी मैदान व कॅम्प नं-३ येथे जून झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख सुरेश बोंबे यांनी माहिती दिली.
उल्हासनगरात सायंकाळी जोरदार पाऊस सुरु झाल्याने, रस्ते निर्मनुष्य झाले. पावसाने नाले तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने, अनेक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र शहरांत होते. खोदलेले रस्ते पाण्याखाली गेल्याने, अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. कॅम्प नं-५, तानाजीनगर येथील नाल्यावरील पूल कोसळला असून परिसराचा संपर्क तुटला. तर व्हिटीसी मैदान व कॅम्प नं-३ परिसरात जून झाड कोसळल्याने, रस्त्याची वाहतूक थांबली.
आयटीआय कॉलेज, कॅम्प नं-५ शांतीप्रकाश आश्रम रस्ता, अंबरनाथ ते कल्याण रस्ता, डॉल्फिन क्लब रस्ता, गुलशननगर रस्ता, गोलमैदान रस्ता आदी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. नागरिकांना व वाहनांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत होते.