शाब्बास पोरी! दोन वर्षांच्या चिमुकलीने केली कमाल; सह्याद्रीच्या कुशीत असलेले 3 किल्ले केले सर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 20:21 IST2021-10-27T20:17:34+5:302021-10-27T20:21:11+5:30
Prachiti Gharat : भल्याभल्या मोठ्यांच्या शौर्याची परीक्षा घेणारे हे तीन किल्ले मात्र वय वर्ष दोन असणाऱ्या प्रचिती घरत या चिमुरडीने "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" या समूहाच्या मदतीने मात्र सहज सर केलेत.

शाब्बास पोरी! दोन वर्षांच्या चिमुकलीने केली कमाल; सह्याद्रीच्या कुशीत असलेले 3 किल्ले केले सर
कल्याण - अलंग, मदन आणि कुलंग म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ४५०० हजार फुटापेक्षा ही अधिक उंचीवर वसलेले तीन किल्ले! इगतपुरीच्या आंबेवाडी या पायथ्याशी असलेल्या गावापासून गड सर करण्यासाठी सुरुवात होते. भल्याभल्या मोठ्यांच्या शौर्याची परीक्षा घेणारे हे तीन किल्ले मात्र वय वर्ष दोन असणाऱ्या प्रचिती घरत या चिमुरडीने "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" या समूहाच्या मदतीने मात्र सहज सर केलेत. कल्याणच्या रामबाग परिसरात प्रचिती राहतेय. दोन दिवसांच्या या मोहिमेत प्रचितीने क्लाइंबिंग आणि राप्पेल्लिंग सारख्या अवघड आणि मोठमोठ्यांना सुद्धा थरारून सोडणाऱ्या गोष्टी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांच्या मार्फत आरामात करून घेतल्या.
आंबेवाडीपासून सुमारे 2 तासांची पायपीट आणि चढण करून गडाच्या पायथ्याशी पोहचता येते आणि तिथून चालू होतो गड सर करण्याचा खरा थरार. अलंग,मदन आणि कुलंग मोहीम यशस्वी करून दाखवताच प्रचितीने ही मोहीम पूर्ण करणारी सर्वात लहान गिर्यारोहक बनण्याचा मान पटकावला. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित देशमुख, भूषण पवार आणि अक्षय जमदारे उपस्थित होते. प्रचितीला प्रत्येक मोहिमेत सहकार्य करणार असे यावेळेस सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांच्या द्वारे सांगण्यात आले.
ज्या वेळी कठीण वळणं यायची त्यावेळी प्रचितीला इतर सदस्य सहकार्य करायचे. मात्र इतक्या लहाण वयात जिद्द चिकाटी ठेवून या मोहिमेत प्रचिती सहभागी झाली ही खूप मोठी गोष्ट आहे. ई वर्ल्ड मधील ई चाईल्डचा मैदानी खेळाकडे कल कमी होत चाललाय. त्यातच आपल्याकडील गड किल्ल्यांची माहिती देखील असणं गरजेचं आहे. योग्य त्या मार्गदर्शनाखाली अशा मोहीम आखल्या तर निश्चितच येणाऱ्या पिढीला गड किल्ल्यांची माहिती मिळेल.