अंबरनाथ नगरपालिकेत ठेकेदारांच्या दोन गटांमध्ये पाेलिसांसमाेर ‘फ्रीस्टाईल’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:55 IST2025-07-18T09:55:04+5:302025-07-18T09:55:17+5:30
एक कंत्राटदार गंभीर जखमी; पालिकेत गुंडाराजची चर्चा

अंबरनाथ नगरपालिकेत ठेकेदारांच्या दोन गटांमध्ये पाेलिसांसमाेर ‘फ्रीस्टाईल’
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका कार्यालयातच गुरुवारी ठेकेदारांच्या दोन गटांमध्ये पोलिसांसमोरच फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या घटनेवरून पालिकेवर ठेकेदारांचेच गुंडाराज आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. या हाणामारीत एक ठेकेदार गंभीर जखमी झाला आहे.
पालिका कार्यालयात फेरीवाल्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. त्याचवेळी पालिकेची लहान-मोठी कंत्राटे घेणारे बॉस्को सुसाईनाथ आणि व्यंकटेश पिचिकरण या ठेकेदारांचे गुंड पोलिसांसमोरच एकमेकांना भिडले. त्यात व्यंकटेश या ठेकेदाराच्या गुंडांनी बॉस्को याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. दोन्ही ठेकेदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद धुमसत होता. त्यावरून पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. परंतु हे दोन गट समोरासमोर येताच पुन्हा त्यांनी एकमेकांवर हल्ला केला.
पोलिसांनाही जुमानले नाही
हाणामारी सुरू असताना पोलिसांनी आणि अंबरनाथ पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी या सर्वांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना न जुमानता दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या गुंडांना ताब्यात घेऊन पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.