मयुरी चव्हाण काकडे :
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून काही दिवस उलटले असले तरी या निकालाची चर्चा अजूनही देशभरात सुरू आहे.. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्याने ईव्हीएम मशीनच्या यंत्रणेवर सोशल मीडियासह इतर व्यासपीठांवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत.. डोंबिवली विधानसभेत ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केल्याची माहिती ताजी असतानाच कल्याण ग्रामीणमध्ये ही मनसेचेराजू पाटील आणि ठाकरे गटाचे सुभाष भोईर या दोघांनीही ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे या मतदारसंघाच्या मतमोजणीची पुन्हा मागणी केली आहे. कल्याण ग्रामीणची लढाई प्रतिष्ठेची.मानली जात होती... या लढाईत खरा सामना भोईर विरुद्ध पाटील असाच होणार असे राजकीय कयास बांधले गेले. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे हे या ठिकाणाहून विजयी झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मोरे हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने त्यांचा विजय संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मतदारसंघात काटे की टक्कर होणार हे अंदाज खोटे ठरले आणि बक्कळ लीड घेऊन राजेश मोरे आमदार झाले. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकालानंतर दोन माजी आमदार एकमेकांच्या संपर्कात आले. ज्या परिसरात संबंधित आमदारांचे वर्चस्व होते त्या ठिकाणाही दोघे आमदार पिछाडीवर होते तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर होते... हे कसे काय शक्य आहे? अशी चर्चा दोन्ही आमदारांमध्ये झाली. त्यानंतर मनसेच्याराजू पाटील यांनी 22 तर सुभाष भोईर यांनी 5 व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला आहे. या वृत्ताला ठाकरे गट आणि मनसेकडून दूजोरा देण्यात आला असून मतमोजणीसाठी लागणारी रक्कम देखील भरण्यात आल्याचे सांगण्यात आले.व्हीव्हीपॅट यंत्रातील मते मोजणीसाठी ठिकाण आणि तारीख निश्चित केली जाईल असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं.राजकारणामध्ये विजय - पराभव या गोष्टी सुरूच असतात मात्र मतमोजणी मध्ये शंभर टक्के गोंधळ झाला असून पुन्हा मतमोजणी केल्यावर काय माहिती समोर येईल ही माहिती नाही पण कल्याण ग्रामीण मधील नागरिकांमध्ये ही या निकालाविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे असे या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे निवडणूक निकालानंतर एकत्र येणारे हे माजी आमदार कल्याण ग्रामीण मधील पुढची राजकीय गणित जुळवण्यासाठी एकत्र येतात का? ते पाहावं लागेल