कल्याण रेल्वे स्थानकातील डिटोनेटर प्रकरणी दोघांना अटक
By अनिकेत घमंडी | Updated: February 25, 2024 00:01 IST2024-02-25T00:01:02+5:302024-02-25T00:01:45+5:30
चोरी करण्यासाठी या दोघा आरोपींनी स्कायवॉक वरील एका जोडप्याची बॅग चोरली.

कल्याण रेल्वे स्थानकातील डिटोनेटर प्रकरणी दोघांना अटक
अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात 54 डिटोनेटर असलेली एक बॅग आढळून आली होती. याप्रकरणी दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडु, ऋषीकेश देविदास निकुंभ अशी अटक आरोपींची नावे आहेत.
चोरी करण्यासाठी या दोघा आरोपींनी स्कायवॉक वरील एका जोडप्याची बॅग चोरली. त्यातील महत्वाचे सामान चोरुन डिटोनेटरसह बॅग कल्याण रेल्वे स्थानकात सोडून पळ काढला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता हे जोडपे कोण होते, त्यांच्याजवळ डिटोनेटर कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात फलाट क्रमांक 1 जवळ एका झाडाखाली चार दिवसांपूर्वी एक बेवारस बॅग आढळून आली. याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक पथक, विशेष तपास पथक यांनी बॅग ची पाहणी केली असता त्यात 54 इलेक्ट्रिक डिटोनेटर आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.