डोंबिवली: साधूची वेशभूषा करून वयोवृद्धाला लुबाडणा-या राहुल भाटी उर्फ मदारी (वय २९ ), आशिष मदारी (वय २०) आणि लखन निकम (वय ३४) अशा तीघा भामटयांना मानपाडा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. तिघांकडून वृद्धाचे लुटलेले दागिने आणि गुन्हयात वापरलेली महागडी कार जप्त केली आहे. सीसीटिव्हीच्या आधारे या भामटयांचे बिंग फुटले असून त्यांनी अशाच प्रकारे साधूची वेशभूषा करून देशातील अन्य राज्यांमध्येही नागरिकांना गंडा घातला आहे.
७५ वर्षीय माधव जोशी हे बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास डोंबिवली खोणी पलावा परिसरातून भाजी खरेदी करून आपल्या घरी परतत होते. घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला एका कारमधून एका साधूबाबाने त्यांना हाक मारली. पदपथावरून घरी चाललेले जोशी आवाज ऐकताच थांबले. कारमध्ये तिघेजण होते त्यातील दोघांनी साधूचा वेश परिधान केला होता. त्यातील एकाने जोशी यांचा हात त्याच्या हातात घेतला. तुमच्या घरात अनेक समस्या आहेत. लवकरच या समस्या दूर होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका असे सांगत जोशी यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळयातील चेन हातचलाखीने काढून घेतली आणि ते तिघे कार घेऊन पसार झाले. आपल्या सोबत फसवणूकीचा प्रकार झाला आहे हे कळताच जोशी यांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. प्रकरणाच्या तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला होता. त्यात गाडी नंबरही दिसला. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून चार तासातच या भामट्या साधू बाबांना शोधून काढले. नवी मुंबई येथील खारघर येथून त्यांना अटक करण्यात आली.
तिघापैकी राहूल हा गुजरातचा राहणारा आहे. आशिष हा भिवंडीतील आहे तर लखन हा सोलापूरचा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी दिली.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, सागर चव्हाण, पोलिस हवालदार राजेंद्र खिल्लारे, सचिन साळवी, सुनील पवार, शिरीष पाटील, संजु मासाळ, विकास माळी, सुशांत पाटील, पोलिस नाईक गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लपा पाटील, पोलिस शिपाई घनश्याम ठाकुर, गणेश बडे, नाना चव्हाण, विजय आव्हाड, अशोक आहेर, सोपान शेळके, योगेश आडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.