भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:56 IST2025-12-11T05:55:19+5:302025-12-11T05:56:56+5:30
शिंदेसेनेत ज्यांनी मनसे, भाजपमधून प्रवेश केला त्यापैकी ज्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक आहेत त्यातील एकाला संधी मिळेल की दोघांना याची चिंता आहे.

भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
डोंबिवली : महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत भाजप व शिंदेसेनेत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांतील कल्याण-डोंबिवलीतील इच्छुकांमध्ये नाराजी आहे. डोंबिवलीत भाजपमध्ये प्रवेश घेतलेले काँग्रेस, उद्धवसेना, मनसेच्या माजी नगरसेवकांमध्ये आता उमेदवारी मिळेल का याची चिंता आहे. तर शिंदेसेनेत ज्यांनी मनसे, भाजपमधून प्रवेश केला त्यापैकी ज्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य इच्छुक आहेत त्यातील एकाला संधी मिळेल की दोघांना याची चिंता आहे.
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
डोंबिवली पश्चिमेला पॅनल २१ व २५ मध्ये भाजप, शिंदेसेनेमध्ये कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे सांगितले जात असले तरी युतीच्या कल्पनेने धाकधूक आहे. पूर्वेला सुनीलनगर प्रभागात ओमनाथ नाटेकर यांना व भाजपचे माजी नगरसेवक पप्पू म्हात्रेंना संधी देताना विचार करावा लागेल. मात्र, त्या तिथेही गांधीनगर, एकतानगर, संगीता वाडी अशा भागात भाजपला उमेदवार द्यावा लागेल, त्यामुळे वरीलपैकी उमेदवाराला संधी मिळू शकते.
भाजपच्या निर्णयावर मदार
अभिजित थरवळ यांच्याबाबत भाजप नेमका काय निर्णय घेऊ शकते हे बघावे लागेल. शिंदेसेनेत आलेल्या विकास म्हात्रे, राजन मराठे यांना प्रत्येकी दोन जणांना उमेदवारी मिळावी असे वाटत असले तरी आता त्यांचे पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात याकडे म्हात्रे, मराठे व पक्षातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. ज्या पॅनेलमध्ये भाजपचे, शिंदेसेनेचे वर्चस्व आहे, तिथे काय निर्णय होईल हे बघणे औत्सुक्याचे आहे. डोंबिवलीत पूर्वेला पॅनेल २६ व २० मध्ये भाजप व पॅनेल २८ आणि २९ मध्ये शिंदेसेना, भाजप अशा दोन्ही पक्षांचे बलाबल आहे.
अभिजित थरवळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. अजून निवडणूक तारखा जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे पुढे काय होते हे बघावे लागणार असून, सध्या वेट अँड वॉचची आमची भूमिका आहे.
सदानंद थरवळ, ज्येष्ठ शिवसैनिक