ठाणे-कल्याण लोकलमध्ये गुर्दूल्यांचा धुमाकूळ : सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल...
By मुरलीधर भवार | Updated: February 17, 2026 19:01 IST2026-02-17T18:59:33+5:302026-02-17T19:01:08+5:30
प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात

ठाणे-कल्याण लोकलमध्ये गुर्दूल्यांचा धुमाकूळ : सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल...
कल्याण : ठाणे ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये गर्दुल्ले खुलेआम नशा करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुपारच्या सुमारास चित्रित झालेल्या या व्हिडिओमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रेल्वे डब्यातच नशा होत असल्याने रेल्वे पोलिस आणि आरपीएफ काय करतात असा संतप्त सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे प्रवासी वर्गाची जिवित सुरक्षितता धोक्यात आली आहे.
ठाणे-कल्याण लोकलमध्ये गुर्दूल्यांचा धुमाकूळ; प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात pic.twitter.com/W3WC0qGbKk
— Lokmat (@lokmat) February 17, 2026
ठाण्याहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये काही गर्दुल्ले थेट डब्यातच नशा करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र रेल्वे स्टेशन परिसरात धुमाकूळ घालणारे गर्दुल्ले आता थेट लोकलच्या डब्यात शिरून खुलेआम नशा करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या विरोधात तातडीने कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.