सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

By मुरलीधर भवार | Updated: June 10, 2025 06:10 IST2025-06-10T06:08:13+5:302025-06-10T06:10:29+5:30

रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला.

Spent 42 lakhs on treatment for seven years; but Railways did not pay a single rupee | सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

मुरलीधर भवार

डोंबिवली : रेल्वे अपघातात मृत्युमुखी अथवा जखमी झालेल्यांबद्दल रेल्वे प्रशासनाला काडीमात्रही सहानुभूती नाही, अशा शब्दांत श्रीराम वैद्य यांनी संताप व्यक्त केला. रेल्वेच्या संवेदनशून्य कारभाराचा अनुभव वैद्य गेली सात वर्षे घेत आहेत. त्यांची मुलगी तेजश्री हिचा धावत्या गाडीतून पडून अपघात झाला. त्यात ती गंभीर जखमी झाली. सात वर्षांपासून ती उपचार घेत असून, तिला रेल्वेने एका पैशाचीही मदत केलेली नाही. तिच्या उपचारावर वैद्य यांनी आतापर्यंत ४२ लाख रुपये खर्च केले.

वैद्य यांनी सांगितले की,  ते एका खासगी कंपनीत काम करीत होते. आता ते सेवानिवृत्त आहेत. ते यापूर्वी विक्रोळीत राहत होते. दोन मुली, मुलगा आणि पत्नी असा त्यांचा परिवार आहे. सध्या ते डोंबिवलीतील गरिबाचा वाडा रोड येथील वसंत हेरिटेज या इमारतीत राहतात. त्यांची मुलगी तेजश्री हिने रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती साठे कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला असताना ती १९ एप्रिल २०१८ रोजी सकाळी परीक्षेसाठी मुंबईला फास्ट ट्रेनने निघाली होती. सायन स्थानकादरम्यान तेजश्री गाडीतून पडली. दोन तास ती रेल्वेच्या नाल्यात पडून होती. तीन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती काेमात होती. काेमातून बाहेर आली असली तरी ती नीट बोलू शकत नाही. तेव्हापासून तिच्या उपचारावर ४२ लाख रुपये खर्च झाले आहेत.

रेल्वेची असंवेदनशील प्रश्नांची सरबत्ती

मुलीचा अपघात झाला याची रेल्वेने साधी विचारपूसही केली नाही. उपचारासाठी खर्च दिला नाही. रेल्वेकडे आर्थिक भरपाई मागितली तेव्हा रेल्वेने आमची उलट तपासणी घेतली. गर्दीतून प्रवास करण्याची गरज काय होती? ती दारात कशाला उभी होती? तुमच्या मुलीचे घरात भांडण झाले होते का?  तुमच्या मुलीचे बाहेर काही प्रेमप्रकरण होते का? या वादातून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला का? अशा  नको-नको त्या असंवेदशील प्रश्नांची सरबत्ती करून आम्हाला गप्प केले. अखेरीस वैद्य यांनी अपघाताची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी मुंबई रेल्वे अपघात न्याय प्राधिकरणाकडे  दावा दाखल केला. आठ लाखांची भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Spent 42 lakhs on treatment for seven years; but Railways did not pay a single rupee