"माणुसकीच्या भिंती"साठी केडीएमसीने दिली जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 15:15 IST2021-01-02T15:15:02+5:302021-01-02T15:15:51+5:30
हेल्पिंग हँड तर्फे जुने वापरातील कपडे कचऱ्यात टाकून देण्याऐवजी गोर गरिबांसाठी गोळा करुन आदिवासी गाव पाडय़ात दिले जातात.

"माणुसकीच्या भिंती"साठी केडीएमसीने दिली जागा
कल्याण - हेल्पिंग हँड या सामाजिक संस्थेतर्फे माणूसकीची भिंत हा समाजिक उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी महापालिकेने कल्याण पश्चिमेतील राणी लक्ष्मीबाई उद्यानानजीक जागा दिली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ वर्षच्या प्रथम दिनी काल करण्यात आला. उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उप अभियंता मिलिंद गायकवाड, प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते, आरोग्य निरिक्षक संजय धात्रक आणि हेल्पींग सामाजिक संस्थेचे सचिन राऊत आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माणुसकीच्या भिंतीला जागा उपलब्ध करुन दिली आहे. हेल्पिंग हँड तर्फे जुने वापरातील कपडे कचऱ्यात टाकून देण्याऐवजी गोर गरिबांसाठी गोळा करुन आदिवासी गाव पाडय़ात दिले जातात. गरजूंना कपडे पुरविले जातात. महापालिकेकडून सध्या शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. महापालिकेने प्लास्टिक, फर्निचर, कपडे, बूट चप्प, इ कचरा आदी कचऱ्यासाठी महिन्याचे विविध रविवार ठरवून दिलेले आहेत. महिन्याच्या सगळ्य़ाच रविवारी प्लास्टिक कचरा वर्गीकरण करुन स्वीकारला जात आहे. मात्र जुने वापरातील कपडय़ासाठी विशिष्ट रविवार ठरवून दिला आाहे.
जुने वापरातील कपडे आणि गृहपयोगी वस्तू कचऱ्यात न टाकता त्या माणुसकीच्या भिंतीजवळ नागरिकांनी स्वत:हून आणून दिल्यास हेल्पिंग हँडद्वारे समाजातील गरजूना पोहचविणे शक्य होणार आहे. त्यामुळे जूने कपडे कचऱ्यात जाणार नाही. तसेच ते गरजूंपर्यंत पोहचतील हा दुहेरी उद्देश साध्य होईल. त्यातून समाजकार्यही साधले जाईल. महापालिकेने राणी लक्ष्मीबाई उद्यानानजीक उपलब्ध करुन दिलेल्या जागेत रकान्याची सुविधा उपलब्ध आहेत. त्या रकान्यात विविध प्रकारातील जुने कपडे नागरिक ठेवू शकतात. महापालिकेच्या अन्य प्रभाग क्षेत्रातही अशा प्रकारची माणुसकीची भिंत उभारण्याचा मानस महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.