ठाकुर्लीत सिग्नलच्या केबल तुटल्या, कॉशन ऑर्डरवर लोकल सुरू; वेग मंदावला
By अनिकेत घमंडी | Updated: January 8, 2024 14:52 IST2024-01-08T14:51:48+5:302024-01-08T14:52:25+5:30
या घटनेचा परिणाम अप/ डाऊन जलद धीम्या चारही लाईनवर झाला. त्यामुळे दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंतच्या लोकलचे वेळापत्रक प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात आले.

ठाकुर्लीत सिग्नलच्या केबल तुटल्या, कॉशन ऑर्डरवर लोकल सुरू; वेग मंदावला
डोंबिवली: मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डाऊन दिशेकडील भागात सिग्नलच्या केबलला जेसीबीचा धक्का लागल्याने त्या तुटल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता घडली, त्यामुळे काही वेळ लोकल खोळंबल्या होत्या. त्यांनंतर कॉशन ऑर्डरवर त्या सुरू झाल्या, परंतु लोकलचा वेग मंदावला होता.
हा अपघात घडल्याने जेसीबीचे काम काही वेळ बंद करण्यात आले. डोंबिवलीच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत संगितले की, कल्याणकडे जाणाऱ्या डाऊन दिशेकडील रेल्वे मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे काहीकाळ सर्वत्र रेड सिग्नल आला, मात्र त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय आल्यानंतर तेथील वाहतूक कोशन ऑर्डरवर सुरु केली. त्या घटनास्थळी ताशी ३० किमी किंवा त्याहून कमी वेगाने लोकल पुढे धावल्या.
या घटनेचा परिणाम अप/ डाऊन जलद धीम्या चारही लाईनवर झाला. त्यामुळे दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंतच्या लोकलचे वेळापत्रक प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात आले. तो बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे रेल्वेची सिग्नल यंत्रणा महत्वाची असून केबलची सुरक्षा जपणे महत्वाचे आहे, जेसीबी तेथे कसा आला? काय काम सुरू होते, त्या कामादरम्यान केबल आहे याबाबतची माहिती संबंधित कंत्राटदार, जेसीबी चालकाला नव्हती का आदी सवाल प्रवाशांनी विचारले. त्यावरून डोंबिवली, ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती, रेल्वेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.