कल्याणमध्ये उबेर बाईक चालकाचे धक्कादायक कृत्य; २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग आणि लुट
By सचिन सागरे | Updated: December 14, 2025 19:11 IST2025-12-14T19:11:15+5:302025-12-14T19:11:30+5:30
कल्याण न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

कल्याणमध्ये उबेर बाईक चालकाचे धक्कादायक कृत्य; २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग आणि लुट
कल्याण : जिमला जाण्यासाठी उबेर अॅपद्वारे बाईक बुक केलेल्या एका २६ वर्षीय तरुणीवर संबंधित बाईक चालकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सिंधीगेट परिसरात घडली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी सिद्धेश संदीप परदेशी (१९, रा. खडकपाडा) याला अटक केली असून, कल्याण न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.
स्टेशन परिसरातील एका जिममध्ये जाण्यासाठी तरुणीने उबेर अॅपद्वारे बाईक बुक केली होती. चालक सिद्धेशने तिला घराजवळून बाईकवर बसवले. मात्र, ओटीपी मोबाईलमध्ये न घेतल्याने तरुणीला प्रवासाबाबतचा संदेश प्राप्त झाला नाही. त्यामुळे, तिने बाईक थांबवून ओटीपी टाकण्यास सांगितले. सिंधीगेट चौकाकडे जात असताना अचानक सिद्धेशने बाईक जवळील एका पडक्या इमारतीकडे वळवली. संशय येताच तरुणीने बाईकवरून खाली उडी मारली, यात तिच्या पायाला दुखापत झाली.
त्यानंतर सिद्धेशने तिला जबरदस्तीने अंधारात ओढत नेऊन तिचा विनयभंग केला. यावेळी त्याने जवळील स्प्रे दाखवत अॅसिड असल्याची धमकी दिली तसेच खिशातून काढलेल्या चाकूचा धाक दाखवला. या धक्कादायक प्रसंगात सिद्धेशने तरुणीकडील सोन्याची व मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. मात्र, प्रसंगावधान राखत तरुणीने धैर्याने प्रतिकार करत स्वतःची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेनंतर तरुणीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सिद्धेशला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.