इंधन दरवाढीविरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात केली घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 17:57 IST2021-06-01T17:56:23+5:302021-06-01T17:57:59+5:30
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत.

इंधन दरवाढीविरोधात डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन; केंद्र सरकारविरोधात केली घोषणाबाजी
डोंबिवली- दिवसागणिक वाढत जाणाऱ्या इंधनाच्या किंमतीविरोधात डोंबिवलीमध्येही पेंढारकर रोडवर असणाऱ्या पेट्रोल पंपाबाहेर शिवसेनेतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलने तर रेकॉर्डब्रेक प्रति लिटर 100 रुपयांचा टप्पा पार करत महागाईच्या आगीत फोडणी टाकली आहे. या पार्श्वभूमीवरवर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेतर्फे "हर हर महंगाई, घर घर महंगाई", मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी करण्यात आली.
तसेच शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून निषेध म्हणून घरगुती गॅस सिलेंडरही आणण्यात आला होता. महागाईचा निषेध म्हणून आंदोलन केल्याची माहिती शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली. मोदी सरकारने सत्तेवर येताना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते, पण प्रत्यक्षात देशामध्ये मात्र महागाईने कहर केल्याने मोदी सरकार नसून हे महागाई सरकार असल्याची टिकाही मोरे यांनी यावेळी केली.