संत सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर लवकरच बॉटनिकल गार्डन; मनसे आमदारांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 11:58 PM2020-12-03T23:58:21+5:302020-12-03T23:59:08+5:30

वनश्री टेकडी परिसरात सकाळ, सायंकाळी नागरिक फेरफटका मारण्याकरिता व व्यायामासाठी येतात.

Sant Savlaram Maharaj Botanical Garden soon on Vanshree Hill; Inspection by MNS MLAs | संत सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर लवकरच बॉटनिकल गार्डन; मनसे आमदारांकडून पाहणी

संत सावळाराम महाराज वनश्री टेकडीवर लवकरच बॉटनिकल गार्डन; मनसे आमदारांकडून पाहणी

Next

कल्याण : ग्रामीण भागातील दावडी, घारीवली, सोनारपाडा, भाल या गावांना लागून असलेल्या संत सावळाराम महाराज वनश्री टेकडीची मंगळवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी केली. या टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन विकसित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वनश्री टेकडी परिसरात सकाळ, सायंकाळी नागरिक फेरफटका मारण्याकरिता व व्यायामासाठी येतात. तर, पक्षिप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी येतात. टेकडीचा परिसर प्रदूषणमुक्त असल्याने तेथे मोकळा श्वास घेता येतो. व्यायामासाठी येणाऱ्यांनी या टेकडीवर वनसंपत्ती जीवापाड जपली आहे. काही नैसर्गिक पाण्याचे स्रोत असून, त्यातील पाणी टेकडीवरील झाडाझुडपांना घातले जाते. त्यामुळे या टेकडीचे संवर्धन झाले आहे. मात्र, काही भूमाफियांनी आणि काही व्यसनी मंडळींनी या टेकडीवर अतिक्रमण केले आहे. काही वेळेस या वनराईला काही अप्रवृत्ती लोक आग लावून ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

दरम्यान, पाटील यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात वनराई विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार या टेकडीच्या संवर्धनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी या टेकडीची पाहणी केली. या वेळी त्यांच्या हस्ते तुळशी रोप लावण्यात आले. बॉटनिकल गार्डन साकारले जाणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

निसर्गप्रेमींनी मांडल्या समस्या
या वेळी निसर्गप्रेमींनी पाटील यांच्याकडे अनेक समस्या मांडला. टेकडीला संरक्षक कुंपण घालण्यात येईल. भगीरथी कुंडाचे पुनरुजीवन करण्यात येईल. झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन व पंपाची व्यवस्था केली जाईल. त्यासाठी पाण्याच्या टाक्या बसविल्या जातील. ही टेकडी म्हणजे डोंबिवलीचे ‘आरे’ असून, ती टिकवून ठेवण्यासाठी नाशिकच्या धर्तीवर येथे बॉटनिकल गार्डनही तयार केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: Sant Savlaram Maharaj Botanical Garden soon on Vanshree Hill; Inspection by MNS MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.