आरपीआयच्या राष्ट्रीय उपाध्यक्षकाचं शेजाऱ्याशी भांडण, वाद सोडविण्यासाठी रामदास आठवलेंची कल्याणमध्ये धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 14:25 IST2020-12-31T14:22:29+5:302020-12-31T14:25:25+5:30
Ramdas Athavale : पोलिसांनी बहादूरे व त्यांच्या शेजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे कळताच राष्ट्रीय उपाध्यक्षाच्या मदतीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले धावले.

आरपीआयच्या राष्ट्रीय उपाध्यक्षकाचं शेजाऱ्याशी भांडण, वाद सोडविण्यासाठी रामदास आठवलेंची कल्याणमध्ये धाव
कल्याण - कल्याण पश्चिमेला आरपीयाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे राहतात. त्यांच्या सोसायटीत त्यांच्या शेजाऱ्यांशी त्याचा वाद झाला. हा प्रकार कळताच हा वाद मिटविण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी सायंकाळी कल्याणमध्ये धाव घेतली. बहादुरे यांच्या घरी आठवले येणार असल्याने त्याठिकाणी पोलीसही पोहचले. सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार उपस्थित होते. दयाल बहादूरे यांचे शेजाऱ्यांसोबत भांडण झाले. या भांडणाचा वाद पोलीस ठाण्यात पोहचला.
पोलिसांनी बहादूरे व त्यांच्या शेजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हे कळताच राष्ट्रीय उपाध्यक्षाच्या मदतीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले धावले. त्यांनी बुधवारी सायंकाळी थेट कल्याण गाठले. बहादूरे यांच्या घरीच पोलिसांसमोर त्यांनी न्याय निवाडा करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी आठवले यांना घडल्या प्रकाराची पार्श्वभूमी कथन केली. तसेच तपास सुरू असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आठवले यांनी सांगितले की, एका इमारतीत राहणाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात शेरेबाजी करुन वाद अथवा भांडण करू नये. एकमेकांना संभाळून घेत राहिले पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी उचित कारवाई करावी असे पोलिसांनी सूचित केले.
नवे वर्ष आर्थिकदृष्टय़ा चांगले असेल - आठवले
कोरोनामुळे 2020 वर्ष हे आर्थिक दृष्टय़ा, सामाजिक आणि आरोग्य दृष्टय़ा अत्यंत वाईट गेले. कोरोना काळात मला ही वाईट अनुभव आला. पाच राज्याचा दौरा करीत असताना लोकांशी संपर्क आाला. त्यामुळे मला देखील कोरोनाचा संसर्ग झाला. 11 दिवस बॉम्बे हॉस्पिटल उपचार घेतले. या काळात मी व्यायाम केला. वाचन केले. स्वत:चे 18 किलो वजन घटविले अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी दिली आहे. नवीन येणारे 2021 हे वर्ष आर्थिक दृष्टय़ा चांगले राहिल. कारण अनलॉकमध्ये सगळे व्यापार उद्योग सुरू झालेले आहे. मात्र कोरोना काही पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सगळ्य़ांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सोशल डिस्टसिंगचा वापर, मास्कचा वापर केला पाहिजे. आरोग्य विषय नियम पाळले पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रलय सामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.