मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या नेत्यांना उभारी मिळू शकते. उद्धवसेना व मनसे यांनी एकत्र यावे, याकरिता पलावा उड्डाणपुलाचे आंदोलन कारणीभूत ठरले होते. कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेनेला फारसा फरक पडला नव्हता. मात्र, मनसेने बाळसे धरल्यावर भाजपला फटका बसला होता. जेव्हा भाजप वाढला, तेव्हा मनसे घटली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर मनसे महापालिकेत वाढली तर त्याचा फटका भाजपला बसून शिंदेसेनेशी युती करून सत्ता स्थापन करणे अडचणीचे ठस शकते. अशावेळी कल्याण-डोंबिवलीतील सत्तेच्या चाव्या राज ठाकरे यांच्या हातात येऊ शकतात.
शिवसेनेत उद्धव व राज ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना कल्याणमध्ये परप्रांतीय परीक्षार्थीना मारहाणीचे प्रकरण घडले. त्यानंतर महापालिकेच्या २०१० साली पार पडलेल्या निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले. तेव्हा भाजपचे जेमतेम नऊ नगरसेवक विजयी झाले.
तेव्हा मनसेमुळे शिवसेनेला नव्हे तर भाजपला फटका बसला. मनसे सत्तेत सहभागी न होता तटस्थ राहिली. पुन्हा शिवसेना-भाजपची सत्ता आली. २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेचा टक्का घसरला. त्यांना केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले.
शिवसेनेच्या त्यावेळी ५२ जागा निवडून आल्या. भाजपच्या ४२ जागा निवडून आल्या. राज्यात आणि केंद्रातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम महापालिका निवडणुकीतही दिसला होता. शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक शिंदेसेनेत गेले. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके ८ ते १० नगरसेवक उद्धवसेनेत आहेत.
डोंबिवली हा रा. स्व. संघ, भाजपचा बालेकिल्ला आहे. कल्याणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. सध्या येथे शिंदेसेना प्रबळ आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्थानिक राजकारणावर वर्चस्व आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही जुन्या शिवसैनिकांना व शिंदेसेनेत अस्वस्थ असलेल्या मंडळींना पुन्हा गळाला लावण्याकरिता उद्धवसेना प्रयत्न करू शकते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव व आदित्य ठाकरे यांनी येथे फारसे लक्ष दिले नव्हते. मनसेचे नेते व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याकरिता आतूर आहेत. अशा परिस्थितीत मनसे वाढल्याने भाजपला यापूर्वी २०१० मध्ये बसला तसा फटका बसला तर शिंदेसेनेच्या भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला धक्का बसू शकतो.