Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:41 IST2025-04-25T06:41:40+5:302025-04-25T06:41:54+5:30
डोंबिवलीतील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांची माहिती : कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी वेचून मारले

Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
डोंबिवली (जि. ठाणे) : आम्ही सर्व जण खूश होतो, फोटो काढत होतो. एका ठिकाणी खाण्यासाठी थांबलो तेव्हा फायरिंगचा आवाज ऐकला. आम्हाला वाटले गेम्स चालू असतील. पण, अचानक फायरिंगचे आवाज वाढले. ‘आप लोगोंने आतंक मचा रखा है, हिंदू और मुस्लीम अलग हो जाओ,’ असे बोलत दोन दहशतवाद्यांनी थेट आमच्या घरातील कर्त्या पुरुषांच्या डोक्यात व पोटात गोळ्या मारल्या. हा थरकाप उडवणारा प्रसंग काश्मीरवरून परतलेल्या मोने, लेले व जोशी कुटुंबीयांनी माध्यमांसमोर कथन केला. मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पर्यटनस्थळी गर्दी असतानाही तिथे एकही लष्कराचा जवान अथवा सुरक्षा रक्षक का नव्हता, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पर्यटक येथे फिरायला येतात, त्यांचा दोष काय होता हे आम्हाला समजले नाही. सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का यांनी केली. वडिलांना आमच्यासमोर गोळ्या घालून मारले. खूप वाईट वाटले, संबंधितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव म्हणाला.
एनआयए टीमने घेतली तिन्ही कुटुंबांची भेट
दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबांची एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) टीमने गुरुवारी डोंबिवलीत भेट घेतली. हल्ल्याच्या दिवशी नेमके काय घडले याबाबत कुटुंबातील सदस्यांचा जबाब एनआयए नोंदवणार आहे. गुरुवारी तिन्ही कुटुंबांच्या घरी जाऊन केवळ भेट घेतली; पण, जबाब नोंदवला नाही. जबाबासाठी पुन्हा येऊ, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.
त्यांनी आमचे काहीही न ऐकता गोळ्या घातल्या...
संजय लेले यांचा मुलगा हर्षल म्हणाला की, आम्ही सर्व मंगळवारी दुपारी बैसरन घाटीत पोहोचलो. पठारावर जाण्यासाठी तीन तास लागतात. तेथे घोड्यावरूनच जावे लागते. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही खाऊन निघत असताना अचानक फायरिंगचे आवाज आले. गेम्स चालू असतील म्हणून पहिल्यांदा आम्ही लक्ष दिले नाही. परंतु, थोड्याच वेळात गोळीबार करणारे जवळ आले. स्थानिकांनी आम्हाला खाली झोपून राहायला सांगितले. आम्ही तसे केले. परंतु, तेथे आलेल्या दोघांनी ‘आप लोगोंने यहाँपे आतंक मचा रखा है; हिंदू और मुसलमान अलग हो जाओ,’ असे बोलत वडील, काका, मामाला गोळ्या घातल्या. माझ्या हाताला गोळी चाटून गेली आणि ती वडिलांच्या डोक्यात घुसली. त्यांनी आमचे काही न ऐकता गोळ्या घातल्या. आम्ही काही करू शकलो नाही.
आईला खांद्यावरून भावंडांनी आणले खाली
आम्हाला स्थानिक लोकांनी ‘तुम्ही येथून लगेच निघा आणि तुमचा जीव वाचवा,’ असे सांगितले. माझ्या आईला डाव्या बाजूला लकवा असल्याने तिला भावंडांनी खांद्यावरून तसेच पुढे घोड्यावरून खाली आणले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खाली पोहोचलो. तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सातच्या सुमारास सांगण्यात आली, सध्या कोणालाही हे सांगू नका, असेही बजावण्यात आले होते. डोंबिवलीतील काका राजेश कदम यांना संपर्क करून ही माहिती दिली. त्यांनी श्रीनगरमधील एका मित्राला फोन केला. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या घरात आमची राहण्याची सोय केली, असा संपूर्ण घटनाक्रम हर्षल लेले याने कथन केला.