भाजप-शिंदेसेना युती झाल्यास एकतर्फी सामना; उद्धवसेना-मनसेपुढे उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:41 IST2025-12-16T10:40:36+5:302025-12-16T10:41:39+5:30
शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने उद्भवलेला वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे गेला.

भाजप-शिंदेसेना युती झाल्यास एकतर्फी सामना; उद्धवसेना-मनसेपुढे उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान
मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत मागील आठवड्यापर्यंत शिंदेसेना विरुद्ध भाजप संघर्ष होण्याची चिन्हे दिसत होती. शिंदेसेनेतील माजी नगरसेवकांना भाजपने प्रवेश दिल्याने उद्भवलेला वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापुढे गेला. त्यानंतर दिल्लीतून युतीचे फर्मान आल्याने या निवडणुकीत शिंदेसेना व भाजप यांची युती झाली, तर ही निवडणूक बऱ्याच प्रमाणात एकतर्फी होण्याचे संकेत आहेत. उद्धवसेना, मनसेतील उरलेसुरले माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजप किंवा शिंदेसेनेत उड्या घेण्याची दाट शक्यता आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मागील वेळी शिवसेना हाच मोठा पक्ष होता. शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले होते. या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली. २०१० च्या निवडणुकीत मनसेने केडीएमसीत बाळसे धरले होते. मात्र, २०१५ च्या निवडणुकीत मनसे कल्याण-डोंबिवली रोडावली व भाजप वाढली. कल्याण-डोंबिवलीत सत्तेकरिता शिवसेना-भाजपने युती केली. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर महापालिकेत भाजपचा महापौर बसवण्याकरिता त्यांनी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक फोडले. यातून युतीत ठिणगी पडली. आता युती झाल्यास शिंदेसेना व भाजपसमोर जागावाटप हेच आव्हान राहील. महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी काय करणार, हे स्पष्ट नाही. उद्धवसेना, मनसे यांच्यापुढे उमेदवार शोधण्यापासून त्यांना ताकद देण्याचे आव्हान आहे.
२०१५ चे पक्षीय बलाबल - १२२ नगरसेवक
शिवसेना - ५३
भाजप - ४३
काँग्रेस - ४
राष्ट्रवादी - २
मनसे - ९
बसपा - १
एमआयएम - १
अपक्ष - ९
सध्या कोणत्या राजकीय पक्षाकडे किती माजी नगरसेवक ?
भाजप - ५२
शिंदेसेना - ५७
उद्धवसेना - ३
राष्ट्रवादी शप गट - ०
राष्ट्रवादी अप गट - २
मनसे - ३
काँग्रेस - १
प्रथमच पॅनल पद्धत
केडीएमसीत यंदा पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. २०१५ च्या निवडणुकीनुसार १२२ नगरसेवकांची संख्या आहे. त्यानुसार ३१ पॅनल तयार करण्यात आले. ३१ पैकी २९ पॅनल हे चार सदस्यीय आहे, तर २ पॅनल हे ३ सदस्यांचे आहेत.