विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन
By प्रशांत माने | Updated: October 22, 2023 16:57 IST2023-10-22T16:57:31+5:302023-10-22T16:57:45+5:30
कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे.

विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन
कल्याण: दृष्टप्रवृत्ती, वाईट विचारांवर विजय म्हणून विजयादशमी म्हणजेच दस-यानिमित्त रावण दहनाची प्रथा आहे. मंगळवारी कल्याण डोंबिवलीत तीन ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर नवरात्रौत्सवाची सांगता होत असल्याने सार्वजनिक मंडळाच्या १३३ तर १७८ खाजगी अशा ३११ देवींच्या मूर्तींचे विसर्जन ३३ ठिकाणी असलेल्या विसर्जन स्थळावर केले जाणार आहे.
कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाची धामधूम सुरू आहे. दोन्ही शहरांमधील एकुण ११ मंदिरांमध्ये हा उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा होत आहे. होम हवन, भंडारा, भजन-किर्तन, महाआरती, जोगवा, गोंधळ आदि कार्यक्रम साजरे होत आहेत. दुर्गा देवीची उपासना आणि आशिर्वाद घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरांबाहेर भक्तांची गर्दी होत आहे. तर १४७ ठिकाणी गरबा-दांडिया खेळण्याचा आनंद लुटला जात आहे. रंगीत रोषणाई आणि संगीताच्या तालावर गरबा आणि दांडिया प्रेमींकडून फेर धरला जात आहे. नवरात्रौत्सवात यंदा १३३ सार्वजनिक मंडळांनी १३३ तर खाजगी ठिकाणी १७८ देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ३४ सार्वजनिक तर ९४ खाजगी ठिकाणी देवीचा फोटो लावून उत्सव व पूजा केली जात आहे.
इथे होणार रावण दहन
दस-याच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळविला होता. या दिवसाला विजयादशमी असेही म्हंटले जाते. या दिवशी रावण दहन केले जाते. यंदा कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा, पुर्वेतील कोळसेवाडी तर डोंबिवलीतील मानपाडा येथील मैदानांवर रावण दहन चा कार्यक्रम पार पडणार आहे.