आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण; कोविड केंद्रात उपचारार्थ दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 23:33 IST2021-11-28T23:32:30+5:302021-11-28T23:33:41+5:30
Omicron Coronavirus Variant : संबंधित प्रवाशी 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत दाखल झाला असून केपटाऊन, दुबई, दिल्ली, मुंबई असा त्याचा प्रवास झाला आहे.

आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण; कोविड केंद्रात उपचारार्थ दाखल
डोंबिवली: एकिकडे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळुन आला असताना तेथून डोंबिवलीत आलेल्या एका 32 वर्षीय प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. त्याला उपचारार्थ कल्याणमधील आर्ट गॅलरी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
सोमवारी त्याचा स्वॅब मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविला जाणार असून त्या अहवालानंतर त्याला लागण झालेला कोरोना नवा स्ट्रेनचा आहे का हे स्पष्ट होईल अशी माहीती केडीएमसीच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
संबंधित प्रवाशी 24 नोव्हेंबरला डोंबिवलीत दाखल झाला असून केपटाऊन, दुबई, दिल्ली, मुंबई असा त्याचा प्रवास झाला आहे. ज्यावेळी त्याचे विमान दिल्लीला उतरले तेव्हा केलेल्या चाचणीत त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. परंतु मुंबईला दाखल होताच त्याची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला याची माहीती कोरोना चाचणी केंद्रातून कळविण्यात आली. त्यावरुन कोरोना बाधित संबंधित व्यक्तीला तातडीने कल्याण लालचौकी येथील कोविड केंद्रात हलविण्यात आले आहे.