आजकाल विनोदाकडे पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन बदलला : समीर चौघुले 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:08 AM2022-05-04T11:08:22+5:302022-05-04T11:09:35+5:30

विनोद, किस्से आणि हास्याचे कारंजे यांनी रंगला सोहळा

Nowadays peoples attitude towards humor has changed said marathi actor sameer chougule namrata awate sambherao hasya jatra | आजकाल विनोदाकडे पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन बदलला : समीर चौघुले 

आजकाल विनोदाकडे पाहण्याचा जनमानसाचा दृष्टिकोन बदलला : समीर चौघुले 

googlenewsNext

डोंबिवली : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणे कल्याण डोंबिवलीच्या शुभारंभाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ‘सोनी टीव्ही’वरील हास्यजत्रेतील कलावंत आणि लेखक समीर चौघुले, प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी हास्यजत्रेच्या कलाकारांनी किस्से सांगून व गमतीजमती करून सभागृहात हास्याच्या लाटांवर लाटा निर्माण केल्या. कलाकारांच्या अदाकारीला रसिकांनी टाळ्यांच्या गजराने दाद दिली; मात्र त्याचवेळी  सध्या विनोदाकडे पाहण्याचा जनमाणसाचा दृष्टिकोन बदलला असून, पुलं यांच्यासह अनेक लेखकांनी जे विनोद त्या काळात केले ते आजच्या वातावरणात करणे त्यांनाही कितपत शक्य झाले असते, अशी शंका व्यक्त केली. कुणावरही विनोद करण्याची सोय नसल्याने आम्ही आमच्यावरच विनोद करून ‘हास्यजत्रेत’ विनोदाचे रंग भरतो, असे ते म्हणाले. डोंबिवली पूर्वेकडील ब्राम्हण सभा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुलाखत आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून समीर, प्रसाद, नम्रता यांनी रसिकांशी संवाद साधला.

‘लॉलीचे पात्र जेव्हा पडद्यावर येते तेव्हा मी माझे घरातील सर्व काम थांबवते,’ अशी तक्रार एका महिला रसिकाने उपस्थित करताच नम्रता यांनी ‘तुम्ही जरी काम थांबवत असलात तरी मला लॉली साकारणे थांबविता येणार नाही,’ असे मार्मिक उत्तर दिले. ‘लॉलीचे सीन ज्या दिवशी हास्यजत्रेत असतील त्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा बाहेरून जेवण मागवा,’ असा सल्ला प्रसाद यांनी देताच सभागृहात एकच हशा पिकला.

चौघुलेंची शहनाई, तर लॉलीचा खुसखुशीत सल्ला

  • चौघुले हे ‘हास्यजत्रे’त वेगवेगळे आवाज काढतात. त्यामुळे रसिकांकडून चौघुले यांच्याकरिता दारावरची बेल आणि शहनाईचा आवाज काढण्याची फर्माईश केली गेली. आवाज काढणे कसे सुचते? असा सवाल चौघुले यांना करण्यात आला. यावर ‘आवाज काढायला सुचणे असे काही नसते. कॉलेजला असताना आवाज काढायची सवय होती,’ असे उत्तर चौघुले यांनी दिले. 
  • चौघुले यांनी थम्स-अप, कोका कोलाची बाटली उघडताना येणारा आवाज, दरवाजाची बेल, शहनाई हे आवाज काढून दाखविले. मोबाईल व्हायब्रेट होतानाचा तसेच पाणी पितानाचा आवाज काढून दाखविताच रसिकांची त्यांना विशेष दाद मिळाली. 
  • ‘हास्यजत्रे’तील गौरव मोरेला वारंवार मारहाण का केली जाते? त्याचे वाईट वाटते. या प्रश्नावर प्रसाद खांडेकर म्हणाले की, गौरव हा हास्यजत्रेतील महत्त्वाचा कलाकार आहे. मला सोशल मीडियावर तसेच फोनवर हीच विचारणा होते. 
  • मी आणि गौरव खूप चांगले मित्र आहोत. मीच त्याला ‘हास्यजत्रे’त संधी दिली. तिचे त्याने सोने केले. मारहाणीचे चित्रीकरण करताना प्रत्यक्षात गौरवला स्पर्शही होत नाही, असे प्रसाद यांनी हसत-हसत सांगितले. 


आपल्या आजूबाजूला किस्से घडले तर ते टिपण्यासाठी आमच्याकडे तिसरा डोळा आहे. विनोद हा तुमच्या, आमच्यात बागडत असतो. बागडणाऱ्या विनोदाला लेखकाने आपल्या मांडीवर बसवायचे असते. मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात जेवढे विनोद घडतात तेवढे इतर कोणाच्या बाबतीत घडत नाहीत. कधीतरी ते तुम्ही अनुभवलेले असतात म्हणून तुम्ही आमच्या विनोदावर हसता. चार्ली चॅप्लिन, दादा कोंडके हे सेलिब्रिटी नव्हते ते तुमच्या, आमच्यातले वाटायचे. तसे आम्हीदेखील सेलिब्रिटी नाही. सध्या कुणाच्या कशावरून कधी भावना दुखावल्या जातील, याचा नेम नाही. विनोदाकडे विनोद म्हणून पाहिले जात नाही. पूर्वीचे विनोदी लेखक आता असते तर त्यांनाही आता लिखाण करता आले नसते. त्यामुळे हल्ली आपल्यावरच आपल्याला लिखाण करावे लागते. हास्यजत्रेच्या निखळ विनोदावर मात्र राजकीय मतभेद होत नाहीत. 
समीर चौघुले, 
लेखक व अभिनेते

‘लॉली’ने ओळख दिली
आम्ही जेव्हा काम करतो, तेव्हा शंभर ते दीडशे जणांची टीम असते; परंतु जेव्हा आम्ही बाहेर जातो, तेव्हा रसिकांचे प्रेम किती आहे, याची जाणीव होते. प्रेक्षक आणि रसिक हे नाते असेच अबाधित राहो. ‘हास्यजत्रे’आधी मी अनेक विनोदी कार्यक्रमांमध्ये काम केले; परंतु ‘हास्यजत्रे’ने मला ‘लॉली’ ही एक वेगळी ओळख दिली. हे पात्र माझ्या एकटीचे नाही. ते फक्त मी सादर करते. त्यामागे क्रिएटिव्ह टीमचे मोठे योगदान आहे. लॉलीचे स्क्रिप्ट प्रसाद लिहितो. त्याच्या लेखणीला मी संपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करते. लॉली कशी असेल, कशी दिसेल ही माझी कल्पना असली तरी तिच्या तोंडची भाषा ही प्रसादची आहे. 
नम्रता संभेराव, 
अभिनेत्री

लिखाणाचे श्रेय क्रिएटिव्ह टीमला
लेखक म्हणून डोळे आणि कान उघडे ठेवून असतो. विनोद हे आजूबाजूला घडतच असतात; परंतु आमच्या लिखाणाचे खरे श्रेय आमच्या सात ते आठ जणांच्या क्रिएटिव्ह टीमला आहे. ३० मिनिटांच्या प्रसारणाची एक स्क्रिप्ट तुम्हाला दिसते. त्यासाठी दोन दिवस क्रिएटिव्ह टीम कष्ट घेत असते. नवीन कल्पना, विनोद सुचतात. त्यावर आम्ही लेखक काम करतो. त्याचे कलाकार मंडळींकडून उत्कृष्ट सादरीकरण केले जाते. चॅनेलची टीम ते लोकांपर्यंत पोहोचविते आणि रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. सर्वांच्या सहवासाने हे चक्र पूर्ण होते.
प्रसाद खांडेकर, 
लेखक व कलाकार

Web Title: Nowadays peoples attitude towards humor has changed said marathi actor sameer chougule namrata awate sambherao hasya jatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.