डोंबिवलीतील नेहरू मैदानाला डेब्रिज व कचऱ्यामुळे आली अवकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:24 IST2021-04-29T23:23:40+5:302021-04-29T23:24:07+5:30
डोंबिवली : एकीकडे कल्याण - डोंबिवली शहरांची सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झाली असताना खेळांच्या ...

डोंबिवलीतील नेहरू मैदानाला डेब्रिज व कचऱ्यामुळे आली अवकळा
डोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरांची सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झाली असताना खेळांच्या मैदानांकडे मात्र केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानाची दुरवस्था पाहता स्पष्ट होते. डेब्रिजचे ढिगारे आणि कचऱ्याचा पसारा पाहता हे मैदान खेळाचे आहे की गैरसुविधांचे, असा प्रश्न उपस्थित होतो.
मैदाने खेळाडूंसाठी असली तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या नेहरू मैदानाची स्थिती पाहता, हे मैदान नव्हे तर कबुतरखाना असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात जागरूक नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही तसेच मनपाच्या महासभेत प्रशासनावर तोफ डागूनही परिस्थिती जैसे थे आहे. याचबरोबर आता मैदानात एका बाजूला मोठ्या प्रमाणावर डेब्रिजचे ढीग जमा झाले आहेत. एका बाजूला कचरा पडला आहे, तर काही ठिकाणी कचरा जाळलेल्या अवस्थेत आहे. पदपथ तुटलेल्या अवस्थेत असून या ठिकाणी नगरसेवक निधीतून बसवलेल्या ओपन जिमच्या साहित्यालाही गंज चढल्याने दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.