ठाणे-कसारा, कर्जत शटल सेवेसाठी नरेंद्र पवार यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे
By अनिकेत घमंडी | Updated: July 20, 2024 19:47 IST2024-07-20T19:47:06+5:302024-07-20T19:47:55+5:30
मुंबईत घेतली भेट, प्रलंबित गुरवली स्थानकाचे मांडले गाऱ्हाणे

ठाणे-कसारा, कर्जत शटल सेवेसाठी नरेंद्र पवार यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे
अनिकेत घमंडी, डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता ठाणे - कसारा आणि ठाणे - कर्जत रेल्वे मार्गावर शटल सेवा सुरू करण्यासह टिटवाळा खडवली दरम्यान नव्या गुरवली रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आज करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह कल्याण - कसारा - कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांच्याकडून याबाबतचे निवेदन रेल्वेमंत्री यांना शनिवारी देण्यात आले.
लाखो प्रवशांसाठी मध्य रेल्वेकडून लोकलच्या केवळ १ हजार ७७२ फेऱ्याच चालवल्या जात आहेत. परिणामी लोकलमधील गर्दीमुळे कल्याण कर्जत कसाऱ्याहून मुंबई ठाण्याकडे जाणाऱ्या सुमारे १६ प्रवाशांचा अपघाती मृत्यू होत असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिली. इतक्या मोठ्या प्रवशांच्या मृत्यूची वाढती संख्या लक्षात घेता ठाणे - कसारा आणि ठाणे कर्जत मार्गावर लोकलची शटल सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. त्यासोबतच मुंबई डिव्हीजन मधील कसारा मार्गावर असलेल्या टिटवाळा आणि खडवली रेल्वे स्टेशन दरम्यानचे अंतर तब्बल दहा किलोमिटरचे असून गेल्या सहा दशकांपासून यामध्ये गुरवली या नविन स्टेशनची उभारणी करण्याची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासनातर्फे याकडे लक्ष दिले जात नसल्याने या गुरवली स्टेशनची उभारणी करण्याची मागणीही यावेळी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि अनंता ढोणे आदी उपस्थित होते.