महावितरणच्या विजेचा खेळखंडोबा सुरूच; नागरिकांच्या झोपेचे झाले खोबरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 15:50 IST2022-04-10T15:48:38+5:302022-04-10T15:50:01+5:30
डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही मुख्य वीजवाहिनीत शुक्रवारी मध्यरात्री बिघाड झाला. त्यामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या ...

महावितरणच्या विजेचा खेळखंडोबा सुरूच; नागरिकांच्या झोपेचे झाले खोबरे
डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही मुख्य वीजवाहिनीत शुक्रवारी मध्यरात्री बिघाड झाला. त्यामुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या झोपेचे खोबरे झाले. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी वीजखंडित झाल्याने नागरिकांनी महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील फिडरवरील वीजवाहिनीतून पुरवठा होणाऱ्या यंत्रणेत मध्यरात्री २ च्या सुमारास अडथळे आले. त्यामुळे पूर्वेतील भगतसिंग पथ, फतेह अली पथ, आगरकर रोड आदी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. तीन तासांनी तो पूर्ववत झाल्याचे रहिवाशांनी सांगितले. सलग तिसऱ्या दिवशी शहरात वीज गायब झाल्याने सतत अडथळे का येत आहेत, असा सवाल नागरिक करत आहेत. मुख्य वाहिनीत बिघाड झाला की त्याचा फटका इतर ठिकाणीही बसतो. त्यामुळे तेथे पुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
दरम्यान, बुधवारी नऊ हजार वीज ग्राहकांचे विजेअभावी हाल झाले. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची महावितरण भरपाई कशी करणार? असा सवाल संतप्त ग्राहक विचारत आहेत. एक दिवस बिल भरायला उशीर झाला तर महावितरण वीज मीटर कापून नेते. मात्र त्या तुलनेत जर महावितरणच्या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला, तर त्याचे काय? असा सवाल नागरिकांनी केला.