११ हजार प्रवाशांचे २७ कोटी १० लाखांचे मोबाइल चोरीस
By अनिकेत घमंडी | Updated: March 5, 2025 10:34 IST2025-03-05T10:33:55+5:302025-03-05T10:34:33+5:30
वर्षभरात मुंबई लोहमार्ग पोलिसांनी ४० टक्के गुन्हे आणले उघडकीस: प्रवाशांच्या हलगर्जीपणाचा मोबाइलचोर उठवतात फायदा

११ हजार प्रवाशांचे २७ कोटी १० लाखांचे मोबाइल चोरीस
अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : गर्दीने तुडुंब भरलेल्या लोकल, लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडील मोबाइल हे चोरट्यांचे ‘लक्ष्य’ असते. २०२४ या वर्षभरात १० हजार ९८१ प्रवाशांचे तब्बल २७ कोटी १० लाख ८ हजार २२३ रुपये किमतीचे मोबाइल चोरीला गेले. त्यापैकी ४,८७५ गुन्ह्यांचा (जेमतेम ४० टक्के) तपास करून मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर संबंधित प्रवाशांना ते देण्यात आले, अशी माहिती मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाने दिली.
मोबाइल चोरीचे सर्वाधिक गुन्हे कल्याण लोहमार्ग पोलिस हद्दीत घडले. सर्वांत कमी कर्जत हद्दीत घडले. वेंधळ्या प्रवाशांवर चोरांचे लक्ष असते. २५ ते ३० हजारांपर्यंतचे मोबाइल हे परराज्यात विकले जातात.
असा केला जातो गुन्ह्यांचा तपास
चोरीस गेलेल्या मोबाइल फोनचा, आयएमईआय नंबरच्या माध्यमातून वारंवार माग काढला जातो. बंद मोबाइल वापराकरिता सुरू करताच त्याचे लोकेशन कळते. स्थानिक पोलिस तो ताब्यात घेतात. अटक केलेल्या आरोपीकडे मोबाइल फोनचा अथवा इतर चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेणे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेतला जातो.
कल्याण जंक्शनवर प्रवाशांची मोठी वर्दळ
कल्याण हे जंक्शन आहे. तेथून भारतात उत्तरेसह दक्षिणेकडे जाणाऱ्या सुमारे २०० हून अधिक लांबपल्ल्याच्या गाड्यांचे अप-डाउन सुरू असते.
गावाकडून आलेले प्रवासी लोकलच्या गर्दीत चढताना त्यांच्या घाईगडबडीचा फायदा घेऊन मोबाइलसह किमती सामान लंपास केले जाते. कल्याण स्थानकातून पहाटे ४ पासून मध्यरात्री अडीचपर्यंत आठशेहून जास्त उपनगरी लोकल फेऱ्या सुरू असतात.
कर्जत, कसारा, आसनगाव, टिटवाळा, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ आणि कल्याण अशा ठिकाणी जाणाऱ्या लोकल कल्याण स्थानकात थांबतात. त्यामुळे या स्थानकात लोकल, मेल, एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची वर्दळ असते.