'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 19:20 IST2025-04-21T19:07:05+5:302025-04-21T19:20:34+5:30

मनसे नेते राजू पाटील यांनी कामाची यादी पाठवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल विचारला आहे

MNS leader Raju Patil has sent a list of work and asked questions to Eknath Shinde | 'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी

'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी

MNS Raju Patil on Eknath Shinde: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या विधानाने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात चर्चा राज्यभरात रंगली आहे. राज ठाकरे यांनी  उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावर प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला कामाचं बोला असं म्हटलं होतं. त्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी कामांची यादी पाठवून डिवचलं आहे.

कल्याण-डोंबिवलीतील विकास कामांच्या मुद्द्यांवरुन मनसे नेते राजू पाटील हे आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत असतात. यावरुन अनेकदा त्यांच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष झाल्याचेही पाहायला मिळालं. त्यानंतर आता  पत्रकारांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला मागे सरकवत जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असं म्हटलं. यावरुनच राजू पाटील यांनी एक्स पोस्टवरुन एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. 

"जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……! परवा आमचे पालकमंत्री श्री. एकनाथजी शिंदे मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे," असं म्हणत राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना १३ कामांच्या बाबत प्रश्न विचारले आहेत. 

"पलावा पुल कधी होईल? लोकग्राम पुल कधी होईल? दिवा रेल्वे ROB कधी होईल? बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल? आणि जर ते झाले नसेल तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रोचे हे काम, ज्यामुळे वाहतुक कोंडीत अधिकच भर पडत आहे ते काम कधी स्थगित करणार? कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल? पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागामालकांना मोबदला देऊन ती बांधकामं तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार? २७ गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पुर्ण करणार? कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला १४० एलएलडी पाणी कोटा आम्हाला कधी वर्ग करणार? अनधिकृतपणे सुरू केलेला दिवा डंपिंग कधी बंद करणार? नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या १४ गावांच्या विकासासाठी आवश्यक ५९०० कोटी रूपयांचा पॅकेज कधी देणार? कल्याण-डोंबिवलीतल्या २७ गावांचा प्रश्न कधी मार्गी लावणार? मानपाडा रोड व कल्याण-शीळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कधी हटविणार? उत्तर द्या एकनाथ शिंदेजी!," असंही राजू पाटील यांनी म्हटलं.
 

Web Title: MNS leader Raju Patil has sent a list of work and asked questions to Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.