अनिकेत घमंडीडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजप व शिंदेसेनेनी विरोधी उद्धवसेना, मनसे व काँग्रेस या पक्षांना खिंडार पाडले आहे. उद्धवसेनेचे नेते दीपेश म्हात्रे, मनसेचे माजी नगरसेवक यांच्यानंतर आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सचिन पोटे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी महायुतीच्या विरोधातील चार लाख मतदारांना मतदानाकरिता संधीच ठेवायची नाही. त्यामुळे विरोधी विचारांचे मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडणार नाहीत व महायुतीचेच मतदार मतदानाला घराबाहेर पडून भाजप किंवा शिंदेसेना यांना मते देतील, अशी खेळी असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील जवळपास चार लाख मतदारांना मतदानाकरिता घराबाहेर पडायची इच्छा होऊ नये इतके विरोधकांना राजकीयदृष्ट्या विकलांग करण्याची ही खेळी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील भाजपविरोधी मते कदाचित शिंदेसेनेला जातील; कारण महापालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात शिंदेसेना हीच विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. यामुळे अखेरीस महायुतीलाच लाभ होणार आहे.
उद्धवसेना, काँग्रेस, मनसे पक्षांतील बडे नेते भाजप किंवा शिंदेसेनेत गेले, तर कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते. निवडणुकीत उमेदवारांना रसद प्राप्त होत नाही. काही वॉर्डांत बिनविरोध निवडणूक होण्याची अथवा उमेदवार तगड्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून मलिदा घेऊन घरी बसण्याची अथवा बसवले जाण्याची शक्यता बळवली आहे. महाविकास आघाडीकडे भाजप, शिंदेसेनेला फाइट देऊ शकेल, असा नेता नसल्याने त्या पक्षांची कोंडी झाली आहे.
सचिन पोटे यांचा राजीनामाकाँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी बुधवारी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत सहा पदाधिकाऱ्यांनीही पदाचा राजीनामा दिला. पोटे सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात होते. त्यांनी महापालिकेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता आणि गटनेतेपद भूषविले आहे. त्यांच्या पत्नी जान्हवी पोटे यादेखील नगरसेविका होत्या. पोटे म्हणाले की, माझा जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने मी राजीनामा दिला. मी अद्याप पक्ष सोडलेला नाही. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही.
Web Summary : BJP and Shinde Sena aim to cripple Kalyan-Dombivli opposition, potentially securing victory. Congress leader Sachin Pote's resignation adds to MVA's woes, paving way for a BJP-Shinde Sena contest.
Web Summary : भाजपा और शिंदे सेना का लक्ष्य कल्याण-डोंबिवली में विपक्ष को कमजोर करना है, जिससे जीत सुनिश्चित हो सके। कांग्रेस नेता सचिन पोटे का इस्तीफा एमवीए की मुश्किलें बढ़ाता है, जिससे भाजपा-शिंदे सेना मुकाबले का मार्ग प्रशस्त होता है।