नेत्यांना आवडतात बाउन्सर्स; निवडणुकीत मागणी अन् दर वाढण्याची शक्यता
By सचिन सागरे | Updated: April 11, 2024 07:00 IST2024-04-11T06:59:54+5:302024-04-11T07:00:39+5:30
चार-सहा बाउन्सर्स आपल्या इर्दगीर्द ठेवण्यात नेत्यांना धन्य वाटू लागले आहे

नेत्यांना आवडतात बाउन्सर्स; निवडणुकीत मागणी अन् दर वाढण्याची शक्यता
सचिन सागरे
कल्याण : बाउन्सर्स म्हणजे गोटीबंद पीळदार शरीर, उंची किमान सहा फूट, डोळ्याला काळा गॉगल आणि आपल्या मालकाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज, असे कणखर, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. अशा बाउन्सर्सची सध्या सर्वच क्षेत्रांत चलती आहे. राजकीय नेत्यांना त्यांची भुरळ न पडती तरच नवल. लोकसभा निवडणुकीच्या हंगामात असे चार-सहा बाउन्सर्स आपल्या इर्दगीर्द ठेवण्यात नेत्यांना धन्य वाटू लागले आहे.
लोकसभानिवडणूक जाहीर झाली आहे. मुंबई परिसरात प्रत्यक्ष मतदानाला अजून सव्वा महिना बाकी असल्याने सध्या तरी विविध पक्षांचे घोडे जागावाटपापाशीच अडले आहे. मात्र, असे असले तरी आपल्याला तिकीट मिळणारच, अशी खात्री असलेल्यांनी प्रचाराचा धडाका सुरूही केला आहे. उन्हातान्हात, गल्लीबोळात, रस्तोरस्ती फिरताना आपला रुबाब अधिक वाढावा यासाठी अशा इच्छुकांनी बाउन्सर्स बाळगल्याचे चित्र आहे. परिणामी ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये बाउन्सर्सची मागणी वाढली आहे.
दर वाढले
बाउन्सर्स दिवसभरात चार ते पाच तास व्यायाम करतात. व्यायाम केल्यानंतर त्यांच्यासाठी पौष्टिक आहार घेणे ही गरज असते. त्यामुळे काही जण पार्टटाइम बाउन्सर्सचे काम करतात. सध्या अनेक कॉर्पोरेट्स, बँका, मोबाइल कंपन्यांची कार्यालये, मॉल यासह अन्य काही ठिकाणी बाउन्सर्स नेमण्यावर भर दिला जातो. बाउन्सर्सचे कामाचे तास ठरलेले असतात. लग्नसराईत सहा तासांसाठी एक बाउन्सर दीड हजार रुपये मेहनताना घेतो. निवडणूक काळात राजकीय मेळावे, प्रचारसभांमध्ये बाउन्सर्स लागत असल्याने बाउन्सर्सचे दर वाढून दोन हजार रुपयांच्या आसपास होण्याची शक्यता आहे.
मराठी तरुण हवे
जिम ट्रेनर, सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच पूर्णवेळ रोजगार नसलेले या क्षेत्राकडे आकर्षित होतात. बाउन्सर्सचे काम करणाऱ्यांकडे उत्तम शारीरिक तंदुरुस्ती, स्मार्ट चेहरा, उत्तम ॲटिट्यूड आणि नजरेत जरब या गोष्टी असायला हव्यात. बाउन्सर्सचे काम करणाऱ्याची शिफ्ट ड्यूटी करण्याची तयारी हवी. बाउन्सर्सना काही वेळा सलग सहा तास न बसता काम करावे लागते. मोठे कार्यक्रम असतील वा राजकीय सभांवेळी बाउन्सर्सची गरज अधिक भासते. या व्यवसायात मराठी तसेच उत्तर भारतीय तरुणांची संख्या अधिक आहे. अनेक खासगी संस्थांतर्फे कंत्राटी पद्धतीने बाउन्सर्स पुरविले जातात.
बाउन्सर्सचे महत्त्वाचे काम असते ते म्हणजे नेते, सेलिब्रेटी यांच्या दिशेने येणारी गर्दी सांभाळणे. एक बाउन्सर सहा तास काम करतो. लग्न सोहळे, राजकीय मेळावे, कार्यालये तसेच इतर ठिकाणी बाउन्सर्सचा पुरवठा करतो. - विशाल म्हस्के, बाउन्सर्सचे पुरवठादार, कल्याण