केडीएमटीची आजपासून डोंबिवली-पनवेल बससेवा; प्रवाशांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:40 IST2020-12-02T01:40:22+5:302020-12-02T01:40:31+5:30
डोंबिवली-दावडी बसचाही शुभारंभ, खबरदारी बाळगण्याच्या सूचना

केडीएमटीची आजपासून डोंबिवली-पनवेल बससेवा; प्रवाशांना दिलासा
डोंबिवली : ‘मिशन बीगिन अगेन’मुळे पूर्वपदावर येत असलेल्या केडीएमटी उपक्रमाकडून बुधवारपासून डोंबिवली-दावडी आणि डोंबिवली-पनवेल या दोन बस चालविल्या जाणार आहेत. सकाळी आणि दुपारी प्रत्येकी एक बस, अशा दोन बस दिवसभरात चालविल्या जाणार आहेत.
कोरोनामुळे केडीएमटीची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. मात्र, सध्या अनेक मार्गांवर बस सुरू झाल्या आहेत. त्यात टिटवाळा, मोहना कॉलनी, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण रिंगरूट, वसंत व्हॅली, गोदरेज हिल, भिवंडी, मलंगगड, पनवेल, तर डोंबिवलीतील निवासी, दावडी, भोपर, नांदिवली, लोढा हेवन, कल्याण-उसाटणेमार्गे पनवेल, डोंबिवली-वाशी, कल्याण-वाशी आणि कल्याण-कोकणभवन-सी.बी.डी. (दोन्ही तुर्भेनाका मार्गे) या मार्गांचा समावेश आहे. दरम्यान, बुधवारपासून डोंबिवली-दावडी (रिजन्सी मार्गे) आणि डोंबिवली-पनवेल (शीळफाटा मार्गे) या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहेत.
मास्कचा वापर बंधनकारक
बसमधील आसनक्षमतेनुसार प्रत्येक आसनावर एक प्रवासी म्हणजे ५० टक्के प्रवासी आणि पाच जणांना उभे राहून प्रवास करता येईल. तसेच प्रवाशांनी फेसमास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. आवश्यक सुरक्षेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना वाहक आणि चालकांना केल्या आहेत.