KDMC Election 2026 Mayor MNS Raj Thackeray News: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना-भाजपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली असली तरी निकालानंतर याठिकाणचे चित्र बदलले आहे. कल्याणमध्ये शिंदेसेनेचे ५३ आणि भाजपाचे ५० नगरसेवक निवडून आलेत. मात्र याठिकाणी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेना मनसे आणि ठाकरेंच्या काही नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतर मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला. यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. उद्धवसेनेला मनसेचा निर्णय पटला नाही. परंतु, आता एक वेगळीच कुजबुज सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी एक मोठी नामी संधी गमावली असून, शिंदेसेनेऐवजी भाजपाला पाठिंबा दिला असता तर मनसेचा महापौर बसू शकला असता, असे म्हटले जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेने एकत्रित येत निवडणूक लढवली. त्यात भाजपाला ५० आणि शिंदेसेनेला ५३ जागांवर विजय मिळाला. भलेही महायुतीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तरीही महापौरपदावरून रस्सीखेंच सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत आकडेमोड, पळवापळवी हा खेळ सुरू होता. ही परिस्थिती थांबताना दिसत नव्हती. भविष्यात समित्यांच्या निवडणुका असतात त्यावेळीही गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे कुठेतरी स्थिरता यावी या हेतूने आम्ही शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदेसेना-भाजपा एकत्र लढलेत. जनतेच्या हितासाठी आम्ही त्यांना समर्थन देत आहोत अशी भूमिका मनसे नेते राजू पाटील यांनी मांडली.
...तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा महापौर बसला असता?
राजकीय वर्तुळातील चर्चांनुसार, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. शिंदेसेनेकडे एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवक आहेत. भाजपाकडे ५० नगरसेवक असले तरी एसटी प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. मनसेच्या ५ नगरसेवकांपैकी १ नगरसेवक एसटी प्रवर्गातील आहे. भाजपाला पाठिंबा दिला असता तर मनसेला महापौरपद मिळू शकले असते, असा दावा करणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती झाली. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत असे राज ठाकरेंनी सांगितले होते. शिंदेसेनेचे ५३ आणि मनसेचे ५ असे मिळून एकूण संख्याबळ ५८ झाले आहे. याठिकाणी बहुमताचा आकडा ६२ असून शिंदेसेनेने सत्ता समीकरणात मनसेला सोबत घेतल्याने भाजपाला धक्का बसला आहे. आता पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदेंचा डाव उलथावून लावण्यासाठी भाजपानेही उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिल्याचे पुढे आले आहे. कल्याण डोंबिवलीत उद्धवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र यापैकी ४ नगरसेवक निकालापासून नॉट रिचेबल आहेत.
Web Summary : Raj Thackeray's MNS supported Shinde's Sena in KDMC. Political circles suggest that allying with BJP could have secured MNS mayoral position due to ST category dynamics.
Web Summary : राज ठाकरे की मनसे ने KDMC में शिंदे की सेना का समर्थन किया। राजनीतिक गलियारों में चर्चा है कि भाजपा के साथ गठबंधन से मनसे का महापौर पद सुरक्षित हो सकता था।