कल्याण-डोंबिवली : मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने 'या' वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 21:50 IST2021-05-31T21:48:27+5:302021-05-31T21:50:35+5:30
अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकांनंही सुरू करण्याची परवानगी. पालिकेनं जारी केली नियमावली.

कल्याण-डोंबिवली : मॉल, शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने 'या' वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी
गेल्या काही दिवसांपासून कल्याणडोंबिवली शहरात रुग्णसंख्या कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास केडीएमसीने परवानगी दिली आहे. आठवड्यातून केवळ 5 दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णसंख्या कमी असणाऱ्या शहरांबाबत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. तसेच ज्याठिकाणी कोविड रुग्णसंख्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल तिकडे कोवीड निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेतही दिले होते. त्यानूसार आज केडीएमसी आयुक्तांनी हे नविन निर्बंध लागू केले आहेत. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून लागू होणार हे निर्बंध 15 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
असे आहेत नविन निर्बंध...
- सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल.
- दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार.
- कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.
- कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू राहतील.
- दुपारी 2 नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे 2 नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने ( मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.
- अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार.
- यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील.