अनिकेत घमंडी/ मुरलीधर भवार
डोंबिवली : कल्याण आरटीओ क्षेत्रात रिक्षाचे थेट प्रवासाचे व शेअरचे किमान आणि वेगवेगळ्या भागात जाण्याचे थेट प्रवासभाडे आरटीओ जाहीर करीत नसल्याने रिक्षाचालकांना प्रवाशांच्या लुटीची संधी मिळत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध करताच कल्याण आरटीओने सायंकाळी भाडेपत्रक जाहीर केले. सोशल मीडियावर हे भाडेपत्रक जाहीर करणाऱ्या आरटीओने रिक्षा स्टँडपाशी मात्र त्याचे फलक अजून लावलेले नाही. यातून आरटीओचा अजब कारभार समोर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील दरपत्रकानुसार रिक्षाचालकांकडून भाडेआकारणी होण्याची शक्यता कमी आहे.
रिक्षा चालकांचा मनमानी कारभार आणि आरटीओचे दुर्लक्ष यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील तीन ते चार दिवस विविध शहरांतील वस्तुस्थिती दर्शवणारी वृत्ते प्रसिद्ध केली.
त्याची दखल घेत आरटीओ अधिकाऱ्यांनी सोमवारी या सर्व शहरांतील रिक्षांचे शेअर व स्वतंत्र प्रवासाकरिता प्रवाशाने द्यायच्या भाड्यासंबंधीचे भाडेपत्रक जाहीर केले. आरटीओने वेगवेगळ्या रिक्षा स्टँडपासून वेगवेगळ्या भागात जाण्यासाठीच्या भाड्याबाबत पत्रक जाहीर केल्याने रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप लागेल, अशी अपेक्षा आहे. आरटीओने ३० जूनच्या तारखेसह दरपत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल केले. हेच भाडेपत्रक रिक्षा स्टँडपाशी लावले तर दर आकारणी करणे बंधनकारक असेल. मात्र ते अद्याप लागलेले नाहीत.
आरटीओच्या भाडेपत्रकानुसार, ०.८ किमी अंतराकरिता शेअर रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला किमान भाडे १२ रुपये आहे. ‘लोकमत’ने २७ जून रोजी दिलेल्या वृत्तात किमान १२ रुपये भाडे कुठेच घेतले जात नाहीत, असे वृत्त प्रसिद्ध केले होते.