कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी जप्त केला सात लाखांचा गुटखा

By मुरलीधर भवार | Updated: December 28, 2023 16:13 IST2023-12-28T16:13:28+5:302023-12-28T16:13:38+5:30

पोलिसांनी गुटखा जप्त केला. या प्रकरणातील मनीष यादव हा मुख्य सूत्रधार आहे.

Kalyan Kolshewadi police seized gutkha worth seven lakhs | कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी जप्त केला सात लाखांचा गुटखा

कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी जप्त केला सात लाखांचा गुटखा

कल्याण- कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीत छापा टाकून तब्बल ७ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. या गुटख्याचा साठा गायकवाड चाळीमधील एका खोलीत करण्यात आला होता. त्याची विक्री करण्यात येणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकून हा गुटखा जप्त केला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मनीष यादव याच्यासह इसरार अहमद, विनोद गंगवाणी आणि त्याचे दोन साथीदार पसार झाले आहेत. कोळसेवाडी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .

विठ्ठलवाडी परिसरातील मंजुनाथ बारच्या मागील बाजूस असलेल्या गायकवाड चाळीतील एका खोलीमध्ये बेकायदेशीरित्या गुटख्याच्या साठा करुन खरेदी विक्री सुरू असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ , पोलीस अधिकारी उल्हास जाधव आणि दिनकर पगारे यांच्या पथकाने गायकवाड चाळीतील खोलीत छापा टाकला. खोलीत तब्बल ७ लाख रुपयांचा गुटखा बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे आढळून आले .

पोलिसांनी गुटखा जप्त केला. या प्रकरणातील मनीष यादव हा मुख्य सूत्रधार आहे. मनिषसह त्याचे साथीदारही पसार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा कुठून आणला ? हा गुटखा कुठे व कुणाला विकणार होते याचा शोध कोळसेवाडी पोलिसांनी सुरु केला आहे

Web Title: Kalyan Kolshewadi police seized gutkha worth seven lakhs