गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली, कसली ब्रेक द चेन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:40 AM2021-04-18T00:40:51+5:302021-04-18T00:41:05+5:30

निर्बंध, सततच्या संचारबंदीमुळे सामान्यांचे मोडले कंबरडे

It's time to break the neck chain, what kind of break the chain? | गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली, कसली ब्रेक द चेन ?

गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली, कसली ब्रेक द चेन ?

Next

मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी महापालिकेने कठोर निर्बंध लादले. मात्र, या निर्बंधानंतरही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. अखेर राज्यातील परिस्थिती पाहता सरकारने कोरोना रुग्णांची वाढती चेन तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ ही नियमावली लागू केली. त्यानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे बाहेर फिरणे शक्य नाही. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सामान्य माणसाला निर्बंधाचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय करणारे लहान-मोठे दुकानदार, व्यापारी यांचे कंबरडे मोडले आहे. सामान्यांनी खायचे काय असा प्रश्न आहे. खाद्यपदार्थांची आणि किराणा मालाची दुकाने सुरू आहेत. मात्र, कामावर गेल्यावर हातात दोन पैसे येणार. कामावर जाण्यासाठी निघाल्यावर रस्त्यात पोलिसांकडून अडवणूक होते. कारण कामावर निघालेला सामान्य माणूस हा अत्यावश्यक सेवेत कामाला नाही. तो कामावर गेला नाही तर खाणार काय, असा प्रश्न आहे. रेल्वेत सामान्य प्रवाशांची कोंडी करण्यात आली आहे. त्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करणे सामान्यांच्या खिशाला परडवणारे नाही. कोरोनाची चेन या निर्बंधामुळे मोडणार असली तरी सामान्यांचे कंबरडेही मोडणार आहे. अशाच तिखट आणि सडेतोड संतप्त प्रतिक्रिया सामान्यांकडून सरकारच्या विरोधात व्यक्त केल्या जात आहेत.

कर्ज कसे फेडायचे..
आमचे कपड्याचे दुकान आहे. पहिली लाट आली तेव्हा आमचे दुकान बंद होते. मोठा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर गणपतीपासून दुकाने काही अंशी सुरू झाली. गणपती व दिवाळीत थोडाफार व्यवसाय झाला. दुकानाच्या जोरावर घराचे कर्ज काढले. आता कर्ज कसे फेडायचे. कारण पहिल्यांदा कडक निर्बंध लावले गेले. राज्य सरकारने ब्रेक द चेन लागू करण्याआधीच मार्च महिन्यापासून कल्याण डोंबिवलीत कडक निर्बंध लागू करून दुकाने बंद करण्यात आली होती.
    - सुरेश तायडे, व्यावसायिक

सततच्या लॉकडाऊनमुळे वाढतोय ताण
घरी मुलगा, सून, मुलगी तिची दोन मुले आहेत. मुलाचे नुकतेच लग्न झाले. कोरोना काळात साधेपणाने लग्न केले. तरी देखील खर्च झाला. आता मुलाला लग्न केलेली चेन मोडण्याची वेळ आली आहे. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी चेन मोडली आहे.
    -चंदाबाई कुमला जाधव, कल्याण
मी एक साधे गृहोपयोगी वस्तूचे दुकान चालविते. त्यासाठी मी एका सहकारी बँकेतून कर्ज काढले होते. लॉकडाऊनपासून आतापर्यंत सारखे दुकान बंद ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडायचे कुठून. सततच्या कोरोना नियमावलीमुळे ताण येत आहे.
    -सारिका ठोंबरे, डाेंबिवली.
नुकतेच मुलीच्या पतीचे निधन झाले. तिला घरी आणले आहे. आता पुन्हा संचारबंदी लागू झाली आहे. तिला पुन्हा सासरी कसे सोडायचे. ती आजारी असल्याने तिच्यावर उपचार करण्यात १७ हजार खर्च झाले. पती व मुलाला तुटपुंजा पगार आहे. घराचे हफ्ते फेडण्यात पगार खर्ची होतो. सततच्या निर्बंधांमुळे जगणे कठीण झाले आहे.
    - सुरेखा जाधव, कल्याण.

Web Title: It's time to break the neck chain, what kind of break the chain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.